वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आयु. रेखा ठाकुर यांनी त्रिपुरा राज्यात नुकत्याच घडलेल्या हिंसाचाराबद्दल १० नोव्हेंबरला एक पत्रक प्रसिध्द केले आहे. हा हिंसाचार विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनी केला आहे. यात तीन मशिदी पूर्णपणे उदध्वस्त केल्या गेल्या. तेथे पवित्र कुराणाच्या प्रती जाळण्यात आल्या. अनेक निरपराध लोकांवर हिंसक हल्ले करून दंगे करण्यात आले. या दंगेखोरी विरोधात निषेध करण्यासाठी गेलेल्या वकील व नागरिकांच्या टीमला सरकारने मज्जाव केला. दंगेखोरांना पाठीशी घालण्याचे काम संघ-भाजपचे केंद्र व राज्य सरकार करत आहे.
प्रत्यक्षात हिंदू विरुध्द मुस्लीम हिंसाचार घडला शेजारच्या बांगला देशात. आणि त्यानंतर हिंसाचार सुरू केला गेला त्रिपुरात! विहिंप, हिंदू जागरण मंच यांच्यासह संघ परिवारातील संघटनांनी मोर्चेही काढले. तेथून थेट फक्त महाराष्ट्रातील अमरावती, अकोट, मालेगांव, देगलूर, पुणे, आदी शहरांत हिंसाचार चालू झाला. धर्म-जातीच्या नावाने चालणारा त्यांचा ब्राह्मणी साम्राज्यवाद!
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात संघ-भाजप, शिवसेना युतीचे सरकार येणार. संघ स्वयंसेवक फडणवीस परत मुख्यमंत्री बनणार या तयारीत असतानाच त्यांच्याच मित्रांनी दगा दिला! राजकीय कुटील डावात त्यांच्या दोस्ताने सेनेला मुख्यमंत्रीपद बहाल केले. पहाटेचे धक्के दिलेल्या त्यांच्याच नातेवाईकाला भाजपपासून बाजूला केले. त्यांना उपमुख्यमंत्री केले!! आतापर्यंतच्या त्यांच्या राजकीय इतिहासाप्रमाणेच सारे घडले. संघ-भाजपचा प्रचंड जळफळाट झाला.
राज्यघटनेच्या आराखड्यावर प्रत्येक कलमावर चर्चा झाली. संघराज्य पध्दती, संसदीय लोकशाही, आदी मुद्दे यात होते. या सर्व पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकर यांनी भारतीय जनतेस उद्देशून लिहिलेल्या त्यांच्या पत्रात सत्ताधारी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षासमोर सक्षम विरोधी राजकीय पक्षाचे महत्त्व सांगितले आहे. ती भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने बजावावी ही त्यांची अपेक्षा होती. परंतु ,त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर हे स्वप्न त्यांच्या वा डॉ.लोहियांच्या सहका-यांनीही पूर्ण केले नाही. प्रत्यक्षात मात्र सत्ताधारी कॉंग्रेस गटांनीच त्यांच्या प्रभावाखालील विरोधी पक्ष उभे केले!
कॉंग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे ऊबग आलेल्या जनतेने संघ-भाजपला औपचारिक सत्तेवर बसविले. त्यांनी प्रशासनात आधीच बहुसंख्य संघीय ब्राह्मण काडर घुसवले होते. ते व सत्ताधारी संघ परिवार मिळून हिंसाचारी धुमाकूळ घालत आहेत. कोणत्याही निवडणुका आल्या की, विद्वेष, खोटेपणा करत हिंसाचार घडवला जात आहे आणि आम्हीच आलटून-पालटून सत्ताधारी म्हणणारी तथाकथीत धर्मनिरपेक्ष कॉंग्रेस हा हिंसाचार चालू असताना मुस्लीम, हिंदू, बौध्द, आदिवासी, आदी समूहांना थांबवायला कधीच पुढे आलेली नाही. हा हिंसाचार घडवून या दोघांनाही हिंदू-मुस्लिमांचे
ध्रुवीकरण घडवायचे आहे. महाराष्ट्रातील वरील जिल्ह्यांतील काही निवडणुकांबरोबरच उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, आदी राज्यांतील निवडणुकांमध्ये राजकीय फायदा करून घ्यायचा आहे. डबल रोल खेळणारी कॉंग्रेस नेहमीप्रमाणे संघ-भाजपची मुस्लीम समूहाला भीती दाखवत त्यांची रक्षणकर्ती कॉंग्रेसच असे सांगत आली आहे. त्यांनी सांभाळलेले काही मुस्लीम नेते त्यांची ही भूमिका समाजात नेत कायम कॉंग्रेसच्या दावणीला समाज बांधीत आले आहेत. कॉंग्रेसच्या या बदमाश राजकीय खेळीला सुरुवातीला ओळखले एड. बाळासाहेब आंबेडकर यांनी. प्रथम कॉंग्रेस-रिपब्लिकन नेत्यांपासून बहुसंख्य बौध्द जनतेला बाजूला आणले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील खरा खुरा विरोधी आणि भविष्यातील वंचित बहुजनांचा सक्षम रिपब्लिकन पक्ष उभा करण्याच्या सामाजिक राजकीय प्रक्रियेला सुरुवात केली. या भक्कम राजकीय पायावर अशाच प्रक्रियेतून ओबिसी-भटके-विमुक्त, मुस्लीम, आदिवासी समूहांना फुले-आंबेडकरी विचार वर्तमानाच्या संदर्भात खुलेपणाने सांगत संघटित करत आहेत. यातूनच अल्पसंख्य सामाजिक समूह हा बहुसंख्य राजकीय समूह बनत जाणार आहे हे नक्की आहे. त्याचीच प्रक्रिया म्हणजे सम्यक समाज आंदोलन, भारिप, बहुजन महासंघ, भाबमसं आणि २०१९ पासूनची वंचित बहुजन आघाडी उभारत आले आहेत. याच प्रक्रियेतून संघ-भाजप-कॉंग्रेसचा असा हिंसाचार रोखला जाऊ शकतो, हा विश्वास आहे.
२०१४ पासून तर संघ-भाजप दिल्लीला भरघोस जागा घेवून सत्तेवर आला आणि त्यांनी सच्च्या फुले-आंबेडकरवादींसह सर्व डाव्या लोकशाहीवादी शक्तिंविरुध्द युध्द पुकारले. त्यावेळी स्वत:ला सॉफ्ट हिंदुत्ववादी म्हणणारी कॉंग्रेस आणि राजकीयदृष्ट्या हाय खालेल्या पुरोगामी शक्तीनीच कॉंग्रेसला धर्मनिरपेक्ष शक्ती म्हणून न शोभणारे फुल त्यांच्या कॉंग्रेसी-टोपीत घालून त्यांना उगाच फुगवले आहे. यामुळेच सामान्य वंचित बहुजन व अगदी आम्हालाही वाटत आले, या डाव्या शक्ती दिल्लीत नेहमी कॉंग्रेस आघाडीसोबत आणि त्यांची सत्ता असलेल्या सर्व राज्यांत मात्र कॉंग्रेस विरोध हे राजकीय कोडे अजून तरी समजलेच नाही! याच्या परिणामी महाराष्ट्रात भाबमसंने जाणिवपूर्वक १९८७ पासून वंचित बहुजनांच्या जमीन हक्क, जातिनिर्मूलन, हक्काची सत्ता, आदी आंदोलनांच्या माध्यमातून खरी खुरी बहुजन श्रमीकांची पर्यायी सामाजिक-राजकीय शक्ती उभी करण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु ,सर्व डाव्या-लोकशाहीवाद्यांच्या राजकीय धोरणामुळे अशी समर्थ सामाजिक-राजकीय आघाडी उभी राहिली नाही! यातून एवढेच दिसते की ,प्रस्थापित व्यवस्थाविरोधातील शक्तींमध्ये महाराष्ट्रासह मूठभर मराठा, ठाकूर, त्रिपाठी, रेड्डी, पटेल, आदी घराण्यांच्या भांडवलशाही समर्थक व जातीयवादी धोरण असणा-यांना सहज प्रवेश दिला गेला. यातूनच सर्वत्र वंचित बहुजन घटकांविरोधी अत्याचार करणा-या कॉंग्रेसला धर्मनिरपेक्ष ही महान पदवी बहाल केली गेली. म्हणून डाव्या-लोकशाहीवादी मित्रांबाबत नाईलाजाने असे बोलावे लागत आहे. या राजकीय धोरणांमुळे त्यांची आदिवासी, शेतकरी-शेतमजूर-कामगार आणि स्त्रियांचे मूलभूत प्रश्न व चळवळीविषयीची सच्ची भूमिका बाजूला ठेवलेली दिसते! त्याचवेळी सूर्यप्रकाशाएवढ्या सत्य असणा-या अन्य कित्येक घटनांकडे मुद्दाम डोळे झाकही करत आले आहेत. मुख्य शत्रू आणि दुय्यम शत्रू या सिध्दांतानुसार येथील सच्च्या फुले-आंबेडकरी चळवळीला दूर ठेवत आहेत!
नुकतीच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक झाली. यात भाजपचे खास. राजेंना जाणत्या राजांच्या कॉंग्रेस पॅनेलने त्यांनाच सामावून घेतले आणि निवडणूक बिनविरोध केली! वंचितला हरवण्याच्या नावाखाली अकोला जि.प. सभापती निवडणुकीतही हेच दिसले. तथाकथित कॉंग्रेस गटांच्या या भाजपधार्जिण्या अचाट राजकीय कौशल्याचा अभिमान असणा-यांनी याविरुध्द कोणतीच स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. याचा राजकीय अर्थ काय घ्यायचा? या सर्व पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकात संघ-भाजपला जनतेचा इशारा मिळाला आहे. एवढेच नाही, तर काहींचे अभ्यासही त्यांना धोक्याचा इशारा देत आहेत. यातूनच संघ-भाजप हडबडून जागी झाली. कर्नाटकात संघ-भाजपने आणि पंजाबात कॉंग्रेसने तात्काळ मुख्यमंत्री बदलले. कुणी कितीही जात नाकारली तरी यातून स्पष्ट दिसले; त्यांना जातींचाच आधार घ्यावा लागला! म्हणून संघ-भाजपने त्यांचा सर्वात आवडता खेळ सामान्य हिंदू विरुध्द सामान्य मुस्लीम असे ध्रुवीकरण करायला सुरुवात केली आहे. अशा खेळात तरबेज कॉंग्रेस यात आणखी तेल ओतत आली आहे. त्यांचे नेते सलमान खुर्शिद व इतर नेते सर्व हिंदूंना कट्टर हिंदुत्ववादी म्हणून सामान्य हिंदूंना ब्राह्मणी संघाकडे ढकलत आहेत. संघाला तालिबानसोबत तुलना करताना त्यांचे असली ब्राह्मणी स्वरूप उघड न करता सर्वसामान्य कष्टकरी हिंदूंना दुखावत आले आहेत. अशा कितीतरी घटनांवरून हेच दिसते की, संघ-भाजप आणि कॉंग्रेस परस्परांना पूरक खेळ करत आहेत! कारण दोघांचाही समान शत्रू ओबिसी-भटका-विमुक्त-हिंदू, मुस्लीम, बौध्द, जैन, लिंगायत, आदिवासी, भटके-विमुक्तादी समूहांतील वंचित बहुजन आहेत. हेच खरे भांडण संघ-भाजप-कॉंग्रेस आणि सच्ची फुले-आंबेडकरवादी वंबआ यात आहे. म्हणूनच कॉंग्रेस कायम बाळासाहेब व वंबाआ ला बदनाम करत आली आहे. दोघे मिळून वंचित बहुजन समूहांचे राजकीय हक्क काढून घेत आहेत. या घटकांचे सामाजिक-राजकीय आव्हान संपुष्टात आणणे हे दोघांचेही एकमेव उद्दीष्ट आहे! कष्टकरी समूह त्यांच्या जीवन मरणाच्या प्रश्नांत होरपळून निघत असताना संघ-भाजप-कॉंग्रेस ईडी, ड्रग, स्मगलिंग, आदींचा खोखो चा खेळ खेळत आहेत.
१५ नोव्हेंबरला पहाटे वयोवृध्द शिवशाहीर व फर्डे वक्ते श्री. ब.मो.पुरंदरे यांचे १०० व्या वर्षी निधन झाले. त्यांना प्रबुध्द भारत व फुले-आंबेडकरी चळवळीच्या वतीने विनम्र अभिवादन! ब.मो. आणि सच्चा फुले-आंबेडकरी विचार यात कधीच सख्य नव्हते. या निमित्ताने अनेकांनी ब.मों.ना आदरांजली अर्पण केली आहे. यातील अनेकजण आजवर आपल्या संघीय-ब्राह्मणी विचारांचा बुरखा लपवून सिने-नाट्य क्षेत्रांत वावरत राहिले. त्यातील श्री. विक्रम गोखले, मृणाल कुळकर्णी, आदी नट, सरसंघचालक श्री. मोहन भागवत, संघ-भाजपचे पंतप्रधान श्री. मोदीजी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार-खासदार, आदींनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या सर्वांचे प्रत्यक्षातील शब्द जरी वेगवेगळे असले त्यांचे खरे सार सनातन संस्थेच्या प्रवक्त्यांनी जाहीर केले आहेत. ते म्हणतात ब.मो. पुरंदरे म्हणजे ब्राह्मतेजाची धगधगती ज्वाला शांत झाली! शिवछत्रपतींविषयीच्या निस्सीम भक्तीच्या बळावर त्यांनी जात्यंधांचा विरोध सहन करून गेल्या अनेक पिढ्या आणि अनेक दशके महाराष्ट्राला शिवसाक्षर करण्यात मोलाचा वाटा उचलला होता. पुढे म्हणते ,सनातन संस्था आणि शिवशाहिरांचे आत्मीय संबंध होते.
याचा अर्थ आजवर शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या नावाखाली जे सांगितले गेले, ते या ब्राह्मतेजाचाच उदो उदो होता! त्यांचा प्रत्येक शब्द अहं ब्रह्मास्मि असतो! ज्या व्यक्तीला इतिहास कशाशी खातात हे ठाऊक नाही तेच आता भारतीय स्वातंत्र्य लढा कधी सुरू झाला आणि स्वातंत्र्य कधी मिळाले हे सांगताहेत आणि त्यांच्या सूरात सूर अन्य संघीय नट-नेते मिसळताहेत. याचे नेतृत्व संघ-भाजपने नुकताच पद्मश्री किताब बहाल केलेली आणि कोणतीही चाड नसलेली सिनेनट कंगना करते आहे. मूळातच संघाला भारताचा सारा इतिहास बदलून परत लिहायचा आहे. त्याचा आधार गोळवलकर गुरूजींचे विचारधन आहे. कंगना, गोखले सारे संघाच्या प्रशिक्षणाप्रमाणेच बोलत आहेत. विद्वेष-हिंसा-खोटेपणा-दंगे ही यांची सत्ताधारी बनण्याची हत्यारे आहे!
शांताराम पंदेरे
मोबा.: ९४२१६६१८५७