बुलढाणा : राज्यात कुंभमेळा होणार आहे. तो प्राथमिक स्वरूपात घ्या, त्याचे 34 हजार कोटी रुपये दुष्काळ निवारण्यासाठी वळवा. ही आमची प्रमुख मागणी असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, सुजात आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते बुलढाणा येथील धम्म मेळाव्यात बोलत होते
सुजात आंबेडकर म्हणाले की, राज्यात दुष्काळाची भयाण परिस्थिती आहे. ऑक्टोबर महिन्यातच दुष्काळाच्या तीव्र झळा बसताय. यावर उपाययोजना करायला सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारच्या 5 हजारांची मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातील 6 हजार रुपये खर्च येतोय. अशा नालायक सरकारचा धिक्कार असो. जळगाव जामोदमध्ये एक पाणी चोर आहेत. या दुष्काळी परिस्थिती परत कोणी पाणी चोरले, तर त्या आमदाराच्या घराला घेराव घाला आणि जाब विचारा. राज्यात दुष्काळाची भयाण परिस्थिती आहे.
काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मदने साहिल वाकोडेला चिटर म्हटले आहे. आजही ट्विटरवर त्यांचे ट्विट आहे आणि त्यांचे नेते राहुल गांधी निळा टी शर्ट घालून संविधान दाखवत फिरत असतात. यांचा छुपा अजेंडा समजून घ्या आणि असे दुटप्पी लोकं ओळखा. असेही सुजात आंबेडकर यांनी म्हटले.

माझी पिढी हुशार झाली आहे, यांच्या खोट्या भूलथापांना बळी पडणार नाही. बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नांतील वंचितांना घेऊन जाणाऱ्या लढ्याचे शिलेदार होणार आहेत. या दुष्काळात भाजप सरकार राज्यावर अजून एक संकट आणत आहे, ते म्हणजे AI डेटा सेंटर. राज्यात 20 डेटा सेंटर सुरू आहेत, त्यांना 32 डेटा अजून उभे करायचे आहेत. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
एक 100 मेगावॅटचे डेटा सेंटर चालवण्यासाठी 20 लाख लिटर पाणी एका दिवसाला लागते. या दुष्काळ परिस्थितीत 32 डेटा सेंटरने एवढं पाणी घेतले तर नागरिकांना पिण्यास पाणी राहील का? एवढाच पाण्याचा वापर झाला तर पुढील 2 महिन्यात सर्व पाणी आटून जाईल. या डेटा सेंटर विरोधात वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल. असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.





