Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home विशेष

“जैविक बुद्धीजीवी ” म्हणून झंझावाती कारकीर्द गाजवणाऱ्या डाॅ. गेल ऑम्वेट

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
September 1, 2021
in विशेष
0
“जैविक बुद्धीजीवी ” म्हणून झंझावाती कारकीर्द गाजवणाऱ्या डाॅ. गेल ऑम्वेट
       

२ ऑगस्ट १९४१ ला अमेरिकेच्या एका राज्यात जन्माला आलेल्या अन् १९७० च्या दशकापासून या देशात एक “जैविक बुद्धीजीवी (Organic Intellectual)” म्हणून झंझावाती कारकीर्द गाजवणाऱ्या डाॅ. गेल ऑम्वेट उर्फ शलाका पाटणकर नावाच्या रणरागिणीचे २५ ऑगस्ट २०२१ रोजी वयाच्या ८० व्या वर्षात पदार्पण करत असतानाच निधन झाले.
गेलबाईंचं असं जाणं आणि या काळात जाणं अत्यंत दुःखद आहे. प्राच्यविद्यापंडीत म्हणत असत त्याप्रमाणे, “जातिव्यवस्थेच्या प्रश्नांवर घनघोर संघर्षाचा, जातीअंताची श्वेतपत्रिकाच तयार करून सम्यक समाज निर्मितीचा संघर्ष टोकाला पोहोचवण्याच्या काळात गेलबाईंचं जाणं एकंदरच वेदनादायी सामाजिक सर्वहारांच्या चळवळींसाठी भरून न येणारं नुकसानच!
मार्क्सवाद – नवमार्क्सवाद- फुले- आंबेडकरांचा वैचारीक वारसा स्वीकारत एक पाय रणमैदानात व एक संशोधनात ठेवणाऱ्या गेलबाई खऱ्याखुऱ्या जैविक बुद्धीजीवी! भारत देशात येण्याचं निमित्त जरी पीएचडी संशोधनाचे असले तरी त्यांचा पिंड होता क्रांतिकारी विचारांचा आणि त्याबरहुकुम व्यवहार करण्याचा.


या जैविक बुद्धीजीवी असणाऱ्या रणरागिणीने वासाहतिक समाजाचा जनवादी अभ्यास केला. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता सत्यशोधक चळवळीचे कागद धुंडाळून अभ्यासले आणि त्यातून साकारला एक महान ग्रंथ Cultural Revolt in Colonial Society. वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंडाचा सोशिओ-पाॅलिटीक अभ्यास आजही तरूण संशोधकांसाठी १९ व्या शतकातील दिपस्तंभाचेच काम करत आहे.


गेल मार्क्सवादी होत्या आणि म्हणूनच त्या तत्त्व आणि व्यवहार यातील अंतर्विरोध जाणत होत्या. प्रॅक्टीससाठी थिअरी गरजेची आणि थिअरीतून प्रॅक्टीस व त्यातून आत्मसात केलेला विचार – तत्वज्ञान त्यांना व्यवहार करण्यास प्रेरणा देत होता. त्यातूनच त्या श्रमिक कष्टकऱ्यांच्या चळवळीचा भाग बनल्या. शेतकरी, शेतमजुर, आदिवासी, स्त्रिया यांच्या चळवळी संघटीत करण्यात पुढाकार घेऊ लागल्या. या थिअरी आणि प्रॅक्टीसच्या अंतर्गतविरोधी नात्यातून १९८० सालात साकारलेला आणखी एक महान ग्रंथ म्हणजे – We Will Smash This Prison : Indian Women In Struggle .


१९८० मध्ये प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकात भारतातील संघर्षरत स्त्रियांच्या लढ्यावर भाष्य करणारे हे पुस्तक आहे. त्यात भारतातील विशेषतः ग्रामीण मजूर, कामगार स्त्रियांचे शोषण व लढ्यांचे विश्लेषण करत स्त्रियांवर पडत असलेल्या दुहेरी शोषणाचा बोजा त्यांनी अधोरेखित केला. पितृसत्तेच्या परिणामातून स्त्रियांना कोणत्याच विषयावर निर्णय घेण्याचा अधिकार नाही हे जळजळीत वास्तव पुढे आणले आणि सोबतच डाव्या चळवळीचे स्त्री प्रश्नाकडे झालेले अक्षम्य दुर्लक्षही त्यांनी मांडले.


एकीकडे गेल बाईंनी स्त्रीवादी चळवळीतील प्रमुख मुद्दे, प्रश्न, भूमिका यांचे सिद्धांतन केले. तसेच प्रचलित स्त्रीवादी सिद्धांताचे मूल्यमापन केले. त्यातील उणीवाही उघड केल्या आहेत. त्यांच्या स्त्रीवादाचा प्रवास स्त्रीवाद मार्क्सवादी स्त्रीवाद क्रांतिकारी स्त्रीवाद पर्यावरणीय स्त्रीवाद असा होत गेलेला दिसतो. पितृसत्ता या ग्रंथात पितृसत्ताकतेची सैद्धांतिक मांडणी गेल बाईंनी केला आहे. त्यानंतर १९९१ मध्ये Violence Against Woman : New Movements and New Theories in India आणि १९९४ मध्ये Gender and Technology : Emerging Asian Vision ही खास स्त्री प्रश्नासंबंधी लिहिलेली पुस्तके आहेत.

१९८९-९० मध्ये महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म व स्मृती शताब्दी वर्ष होते. यावेळी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध पैलूंवर लिहिले गेले. आधी न लिहिले गेलेले विषयही त्यातून पुढे आले. जसे डॉ. आंबेडकरांचा स्त्रीमुक्तीचा विचार मांडला गेला. गेल बाईंनी “जोतीबा फुले आणि स्त्रीमुक्तीचा विचार” ही छोटेखानी पुस्तिका लिहिली आहे. ती पुस्तिका अवघ्या ४२ पानांची जरी असली तरी महात्मा जोतीबा फुले यांच्या स्त्रीविषयक विचारांचे स्त्रीवादी वाचन, लेखन या निमित्ताने केले आहे. त्यात महात्मा फुलेंनी स्त्रियांच्या दडपणुकीच्या केलेल्या वर्णनाला त्या अधोरेखित करतात. गेलबाईंनी बहुभार्या पद्धतीवर ओढलेले आसूड मांडले आहेत. सतीप्रथेसंदर्भात स्त्री व पुरूषांना असलेल्या वेगवेगळ्या निकषांची उकल करत जोतीरावांचा स्त्रीवाद पुढे आणला आहे. पुराणातील उदाहरणांमधून पितृसत्ताक मूल्यांचे पुनरूत्पादन केले जाते हे सतीसावित्रीच्या मिथकामधून मांडले आहे. जोतीबांचा ”तो कधी ‘सता’ गेला आहे का?” हा सवाल डाॅ. गेल यांना कळीचा वाटतो.


जोतिबांनी कल्पलेली कुटुंबसंस्थेची पुनर्रचनेची सिद्धांत या पुस्तिकेत त्यांनी केले आहे. डाॅ. गेल यांच्याच शब्दांत महात्मा फुलेंचे योगदान असे होते की, ‘ही स्त्रियांची मुक्ती होण्याच्या दृष्टीने कुटुंबपद्धतीची पुनर्रचना हा विचार व कार्यक्रम नंतरच्या काळात त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे अंग म्हणून पुढे आला. त्यांच्या ऐतिहासिक विचारसरणीच्या वैशिष्ट्यांमुळेच धर्म, संस्कृती, रूढी यांचा उच्छाद आणि कुटुंब पद्धतीची पुनर्रचना या गोष्टींवर भर देऊ शकले.’ ‘वर्ग’ ऐवजी फुलेंनी ‘जात’ संबंध हे शोषणाचे साधन म्हणून मांडले.


वसाहतिक काळातील सांस्कृतिक बंड अभ्यासणाऱ्या गेलबाई अखेरच्या टप्प्यात बुद्ध-तुकोबा-नामदेव परंपरेकडे वळल्या. डाॅ. गेल यांची सांस्कृतिक बंडखोरी अखेरपर्यंत जारी होती. बुद्धिझम इन इंडिया, चॅलेंजिंग ब्राह्मणीझम अँड कास्ट सारखी ग्रंथ याच प्रवासात आले. या प्रवासातील आणखी एक मास्टरपीस म्हणजे ‘सीकींग बेगमपुरा’. संत रविदासांनी कल्पना केलेले “दुःखविरहित भव्य राज्य” अर्थात बेगमपुरा. जिथे कुठलीच वेदना नाही, मालकीभाव नाही, दहशत नाही, छळ नाही, चिंता नाही…. असे राज्य बेगमपुरा! संत रविदासांच्या स्वप्नातील या राज्याला वाट पुसत गेलबाईंनी सिकींग बेगमपुरा लिहिलं. त्यांचा बेगमपुरा समतावादी, पर्यायी समाजाच्या कल्पनेत साकार झाला आहे. शोषितांनी स्वतःचे दुःखमुक्तीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी अखंडपणे संघटीत प्रयत्न करत राहणे हा त्यांच्या बेगमपुराचा सांगावा आहे.
डाॅ. गेल ऑम्वेट यांना अखेरचा सत्य की जय हो! जय भीम! लाल सलाम

  • प्रतिमा परदेशी

       
Tags: ambedkarmovementbharatpatankargelomvetpratimapardesi
Previous Post

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येक व्यक्तीचे कृतज्ञतापूर्वक स्मरण ही काळाची गरज – अशोक सोनोने

Next Post

फाळणीची जखम

Next Post
फाळणीची जखम

फाळणीची जखम

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
श्रावणी शनिवारची भक्तीमय पर्वणी; शनिशिंगणापूरला भाविकांची अलोट गर्दी
बातमी

श्रावणी शनिवारची भक्तीमय पर्वणी; शनिशिंगणापूरला भाविकांची अलोट गर्दी

by Tanvi Gurav
July 27, 2025
0

शनिशिंगणापूर - श्रावण महिन्यातील दुसऱ्या शनिवारनिमित्त शनिशिंगणापूर मंदिरात शनिदेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली. पहाटेपासूनच विविध भागातून आलेल्या भक्तांनी दर्शनासाठी...

Read moreDetails
धर्म विचारून गाय चोरीचा आरोप करून मारहाण झालेल्या राहून पैठणकर यांची घेतली वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी भेट.!

धर्म विचारून गाय चोरीचा आरोप करून मारहाण झालेल्या राहून पैठणकर यांची घेतली वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी भेट.!

July 27, 2025
पोटेगाव सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध — वंचित बहुजन आघाडीचा करमाळा तहसील कार्यालयावर मोर्चा; मोर आणि गोरगरिबांच्या अस्तित्वासाठी लढा

पोटेगाव सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध वंचित बहुजन आघाडीचा करमाळा तहसील कार्यालयावर मोर्चा; मोर आणि गोरगरिबांच्या अस्तित्वासाठी लढा

July 27, 2025
बौद्ध तरुणाच्या मारहाण प्रकरणी खामगावात तीव्र निषेध

बौद्ध तरुणाच्या मारहाण प्रकरणी खामगावात तीव्र निषेध

July 26, 2025
कोल्हापूर जिल्ह्यात बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेश सीमेपर्यंत पोहोचले धागेदोरे

कोल्हापूर जिल्ह्यात बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेश सीमेपर्यंत पोहोचले धागेदोरे

July 26, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home