पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चांवर निर्बंध घालणारा ठराव मागे घेऊन सम्यक विद्यार्थी आंदोलनाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करत संघटनेने कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासनाला तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. या कालावधीत मागण्या मान्य न झाल्यास ‘कुलगुरू हटाव, विद्यापीठ बचाव’ ही भूमिका घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या सभेत विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चांवर निर्बंध घालणारा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावात सम्यक विद्यार्थी आंदोलनाने आयोजित केलेल्या विद्यार्थी आक्रोश मोर्चाचा उल्लेख करण्यात आल्याने संघटनेने नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने कुलगुरूंना निवेदन देण्यात आले.
निवेदन देण्यासाठी गेलेल्या सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या शिष्टमंडळाला कुलगुरू विद्यापीठात उपस्थित असतानाही सुरुवातीला भेट मिळाली नाही. त्यामुळे शिष्टमंडळाने विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनानंतर कुलगुरूंनी शिष्टमंडळाला भेटण्यासाठी वेळ दिला.
यावेळी शिष्टमंडळाने संबंधित ठराव तातडीने मागे घ्यावा आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाची अधिकृत प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर माफी मागावी, अशी मागणी कुलगुरूंसमोर मांडली.
भारतीय संविधानाने नागरिकांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि शांततापूर्ण सभा घेण्याचा अधिकार दिला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि लोकशाही हक्कांचे संरक्षण करणे ही विद्यापीठ प्रशासनाची जबाबदारी आहे. विद्यार्थी संघटनांच्या प्रश्नांवर संवाद साधण्याऐवजी आंदोलनांवर निर्बंध घालणे ही चिंतेची बाब असल्याचे सम्यक विद्यार्थी आंदोलनाने म्हटले आहे.
विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांवर गदा आणणारा ठराव सहन केला जाणार नाही. तीन दिवसांच्या आत ठराव मागे घेऊन संघटनेची जाहीर माफी मागावी; अन्यथा पुढील तीव्र आंदोलनाची जबाबदारी विद्यापीठ प्रशासन आणि कुलगुरूंवर असेल, अशी भूमिका शिष्टमंडळाने मांडली.
विद्यापीठ प्रशासनाने तीन दिवसांच्या अल्टिमेटममध्ये मागण्या मान्य न केल्यास ‘कुलगुरू हटाव, विद्यापीठ बचाव’ ही भूमिका घेऊन पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येईल, असे संघटनेने स्पष्ट केले. विद्यार्थ्यांचे हक्क, संविधानिक मूल्ये आणि आंबेडकरी विद्यार्थी चळवळीचा सन्मान याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा निर्धारही संघटनेने व्यक्त केला.
या वेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद तायडे, पर्वती विधानसभा अध्यक्ष रवी गायकवाड, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पुणे शहर उपाध्यक्ष प्रज्योत गायकवाड, किरण सैंदाणे, संघर्षा संखद, अभिराज कांबळे, संतोष सोनकांबळे, देवा सोनखांबळे, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राहुल ससाने, युनिट अध्यक्ष अभिषेक शेलकर आणि आंबेडकरी कार्यकर्ते श्रीकांत कांबळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
सम्यक विद्यार्थी आंदोलनाने विद्यापीठ प्रशासनाला दिलेल्या तीन दिवसांच्या मुदतीत संबंधित ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे. आता विद्यापीठ प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे विद्यार्थी आणि आंबेडकरी चळवळीचे लक्ष लागले आहे.
– सम्यक विद्यार्थी आंदोलन, पुणे शहर





