– आकाश मनिषा संतराम
भारतीय राजकारणाचा आणि समाजकारणाचा इतिहास पाहिला, तर जेव्हा जेव्हा प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरुद्ध किंवा सामाजिक विषमतेविरुद्ध असंतोष निर्माण होतो, तेव्हा तरुण वर्ग हा बदलाचा मुख्य केंद्रबिंदू ठरतो. २०१४ च्या सत्तांतरानंतर देशात आणि राज्यात उजव्या विचारसरणीचा प्रभाव वेगाने वाढत गेला. एका बाजूला आर्थिक विकास, आंतरराष्ट्रीय प्रतिमेचे संवर्धन आणि ‘डिजिटल इंडिया’ यांसारखी आधुनिकतेची चित्रे रंगवली जात असताना, दुसऱ्या बाजूला देशातील प्रस्थापित गांधीवादी, मार्क्सवादी आणि धर्मनिरपेक्षतावादी विचारांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेससारख्या विरोधी पक्षांनी राफेलसारखे मुद्दे उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला असला, तर दुसरीकडे प्रादेशिक आणि सामाजिक पातळीवर नवी राजकीय समीकरणे आकाराला येत होती. २०१९ च्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षासोबत युती करत ‘वंचित बहुजन आघाडी’च्या माध्यमातून महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-शिवसेना या दोन्ही प्रस्थापित आघाड्यांना आव्हान देणारी तिसरी शक्ती उभी केली.
वंचित बहुजन आघाडीच्या निर्मितीचा मूळ गाभा सामाजिक न्याय आणि उपेक्षित घटकांना राजकीय प्रतिनिधित्व देणे हा होता. काळानुरूप या पक्षाने आपल्या कार्यशैलीत व्यापकता आणत केवळ पारंपरिक मतपेढीवर अवलंबून न राहता तरुणांच्या, विशेषतः ‘Gen-Z’ (१९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेली पिढी) च्या प्रश्नांना अग्रक्रम देण्यास सुरुवात केली आहे. आज भारताच्या लोकसंख्येतील एक चतुर्थांशपेक्षा अधिक वाटा या Gen-Z पिढीचा आहे. राजकीय मुद्द्यांकडे पाहण्याचा, त्यावर भाष्य करण्याचा आणि स्वतःचे हक्क मागण्याचा या पिढीचा दृष्टिकोन अत्यंत थेट आणि डिजिटल माध्यमांवर आधारित आहे. अशा परिस्थितीत, या नव्या पिढीचा राजकीय आवाज ओळखून त्यांच्याशी थेट संवाद साधण्याची रणनीती वंचित बहुजन आघाडीने आखल्याचे दिसते.
महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांचा गोंधळ, नोकरभरतीतील गैरप्रकार आणि शैक्षणिक घोटाळे हे सध्याच्या तरुणाईसमोरील सर्वात मोठे संकट बनले आहे. तलाठी भरती, वनरक्षक भरती आणि TET परीक्षेतील अनियमितता यांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात सापडले आहे. वनरक्षक परीक्षेत अत्यंत कमी गुण मिळवणारा विद्यार्थी तलाठी परीक्षेत गुणांचा उच्चांक मोडीत काढायचा किंवा नॉर्मलायझेशनच्या नावाखाली २०० मार्कांच्या पेपरमध्ये २१४ ते २८० गुण मिळायचे, हे तर्कहीन आणि पारदर्शकतेचा अभाव दर्शवणारे होते. परीक्षा केंद्रांचे फुटेज, लॉगिन आयडी आणि गुणवत्ता यादीतील संशयास्पद बाबी यांवर प्रा. विठ्ठल कांगणे यांच्यासारख्या अभ्यासकांनी आवाज उठवला, तेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर आणि त्यावेळेचे युवा आघाडीचे महासचिव आणि आताचे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली.
हा फक्त विधाने किंवा कागदी पाठिंबा नव्हता, तर पक्षाच्या ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन’ या विद्यार्थी संघटनेने प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कृती केली. TET पेपर फुटी प्रकरणी थेट राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानी आंदोलन करण्यात आले. या आक्रमक भूमिकेनंतर शिक्षणमंत्र्यांना आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या १२ पैकी ७ मागण्या मान्य कराव्या लागल्या आणि उर्वरित मागण्यांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन द्यावे लागले. मांजरी (पुणे) येथील आदिवासी विद्यार्थी वसतिगृहाला भेट देऊन सुजात आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांच्या निधी चोरी आणि हक्क हिरावण्याच्या प्रयत्नाविरुद्ध दिलेला इशारा हा या संघटित प्रतिकाराचाच एक भाग होता. जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांना आणि तरुणांना न्यायासाठी लढा द्यावा लागला, तेव्हा या पक्षाने प्रशासनाला धारेवर धरले आहे. दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पुकारलेला महाराष्ट्र बंद हे दाखवून देतो की, विद्यार्थ्यांचा सन्मान आणि सुरक्षा हा पक्षाच्या अजेंड्यावरील प्राधान्याचा विषय आहे.
विद्यार्थ्यांच्या या संघटित असंतोषाला आणि तरुण पिढीच्या आकांक्षांना एका वैचारिक आणि संवादात्मक विचारपीठावर आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने ‘जय भीम Gen-Z’ ही टाउनहॉल मालिका सुरू केली आहे. सोशल मीडियावर या उपक्रमाचा टीझर प्रसिद्ध होताच तरुणांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. टाउनहॉल म्हणजे राजकीय नेते आणि नागरिक यांच्यातील असा थेट, खुला संवाद, जिथे कोणत्याही मध्यस्थाशिवाय प्रश्न विचारले जाऊ शकतात.
फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचा पाया भक्कम ठेवून नव्या पिढीच्या भाषेमध्ये – म्हणजे शिक्षण, सामाजिक न्याय, डिजिटल हक्क, रोजगार आणि पारदर्शक शासन – संवाद साधणे हा यामागील मुख्य हेतू आहे. हा उपक्रम फक्त राजकीय प्रचाराचे साधन नाही, तर तरुणांचे प्रश्न आणि चिंता थेट ऐकून घेण्याचा एक प्रयत्न आहे.
या सगळ्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींकडे पाहिले असता, वंचित बहुजन आघाडी फक्त आंदोलनांपुरती मर्यादित न राहता सामाजिक सन्मानाची संस्कृतीही जोपासताना दिसते. ‘जलसा वंचित बहुजनांचा – २०२६’ या ३ जून २०२६ रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्यगृह येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, तंत्रज्ञान, वैद्यकीय, कला आणि फोटोग्राफी अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना ‘VBA सन्मान पुरस्कार – २०२६’ देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. एका बाजूला विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करायचा आणि दुसऱ्या बाजूला समाजातील सकारात्मक आणि सर्जनशील योगदानाचा गौरव करून तरुणांना प्रेरणा द्यायची, असा दुहेरी आणि समतोल दृष्टिकोन पक्षाच्या धोरणात दिसून येतो.
महाराष्ट्राच्या राजकारणात पारंपरिक राजकीय पक्ष अजूनही जुन्याच जातीय, प्रांतीय आणि राजकीय गणितांमध्ये अडकलेले असताना, वंचित बहुजन आघाडीने Gen-Z कडे लक्ष केंद्रित करून एक दूरगामी पाऊल उचलले आहे. बेरोजगारी, पेपरफुटी आणि शैक्षणिक भ्रष्टाचाराने ग्रासलेली तरुण पिढी आज अशा नेतृत्वाच्या शोधात आहे, जे त्यांच्या प्रश्नांवर केवळ राजकारण न करता थेट कृती करेल आणि त्यांना संवादाचे विचारपीठ उपलब्ध करून देईल. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला हा राजकीय प्रवास आता सुजात आंबेडकर, राजेंद्र पातोडे आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून नव्या पिढीच्या आकांक्षांशी जोडला जात आहे.
थोडक्यात सांगायचे तर, ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिका आणि शैक्षणिक घोटाळ्यांविरोधातील आक्रमक एल्गार या दोन्ही गोष्टी एकमेकांशी अत्यंत घट्ट जोडलेल्या आहेत. रस्त्यावरील संघर्ष आणि सभागृहातील थेट संवाद यांची सांगड घालून वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्राच्या राजकारणात तरुणाईला केंद्रस्थानी आणण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न येणाऱ्या काळात राज्याची राजकीय दिशा आणि Gen-Z पिढीचा राजकीय सहभाग निश्चित करण्यात किती प्रभावी ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.





