मुंबई : राज्यातील शेतकऱ्याची फसवणूक करणारे सदोष आणि बोगस बियाणे विक्रेते खाजगी कंपन्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून अशाच तक्रारीवर महाबीज अधिकारी ह्यांना देखील अटक करून शेतकऱ्यांना संपूर्ण हंगामाची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.
सदोष बियाणे आणि उगवण न झाल्याचे राज्यात १७,४७३ तक्रारी आहेत. त्यात प्रत्यक्ष पाहणी १०००० शेतकऱ्यांची करण्यात आली असून तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने १०,११३ प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी पूर्ण केली असा दावा केला जातो. ७,८११ बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले, ज्यापैकी १,०८२ नमुने अप्रमाणित निकृष्ट दर्जाचे आढळले.त्यात सरकारी कंपनी महाबीज चे देखील बियाणे आयात.त्यावरून फक्त खाजगी कंपन्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या अहवालांच्या आधारे दोषी कंपन्यांवर आतापर्यंत ८५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राज्यभरात दाखल झालेल्या ८५ गुन्ह्यांमध्ये, सर्वाधिक ७५ अमरावती विभागात दाखल आहेत. अनेक खाजगी कंपन्यांचे संचालक, व्यवस्थापक आणि बोगस बियाणे पुरवठा करणाऱ्या वितरकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे व काहींना अटक करण्यात आली आहे.
शासकीय संस्था महाबीजच्या विरोधात लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी आणि जालना या जिल्ह्यांतून सर्वाधिक १,००० हून अधिक तक्रारी आल्या आहेत. परंतु, महाबीजच्या कोणत्याही अधिकाऱ्यावर कुठेही गुन्हा दाखल झालेला नाही. खाजगी कंपन्यांवर थेट गुन्हे दाखल केले जात असताना, महाबीजला मात्र कृषी विभागाने स्वतःहून अंतर्गत चौकशी करण्याची आणि शेतावर जाऊन पाहणी करण्याची सवलत दिली आहे.
महाबीजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर थेट अटकेची कारवाई झालेली नाही. महाबीज प्रशासनाने दोषी लॉट्सच्या शेतकऱ्यांना बियाणे बदलून देणे किंवा रोख परतावा किंमत परत करणे देण्याचे धोरण राबवले आहे.हा चोराला चौकशी करण्याचा अधिकार प्राप्त करून देण्यासारखे आहे.खाजगी कंपन्यांप्रमाणेच महाबीजच्या जबाबदार अधिकाऱ्यांवरही कडक कायदेशीर कारवाई आणि अटकेची मागणी वंचितची आहे.सोबतच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण हंगामाची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी देखील वंचितने केली आहे.





