– संजीव चांदोरकर
आपल्या देशातील म्युचुअल फंड उद्योगाची गेली काही वर्षे कोटीच्या कोटी उड्डाणे सुरू होती ही आता काही बातमी राहिलेली नाही.
त्यात निम्न मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीयांमध्ये लोकप्रिय असलेल्या एस आय पी योजनातेनंतर्गत म्युच्युअल फंडात गुंतवणूकदारांची संख्या साडे दहा कोटी पर्यंत पोचली आहे. तर म्युच्युअल फंडाकडे गोळा होणारा ॲसेट अंडर मॅनेजमेंटचा आकडा वाढून ७४ लाख कोटी रुपये झाला आहे.
यात मुद्दामहून लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत मोठ्या शहरापर्यंत मर्यादित असणारी म्युच्युअल फंड इंडस्ट्री देशातील दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील शहरांमध्ये देखील लोकप्रिय होत आहे.
निम्न/ मध्यमवर्गीय म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीकडे बँकांच्या मुदत ठेवींमधील गुंतवणुकीला पर्याय म्हणून बघतात.
दुसऱ्या शब्दात त्यांची अशी (वाजवी ?) अपेक्षा असते की म्युच्युअल फंडात गुंतवणुक केल्यानंतर त्यांचे मुद्दल तर शाबूत राहीलच आणि वर त्यांना बँकेतील मुदत ठेवींवर जे व्याज मिळू शकते त्यापेक्षा जास्त रिटर्न मिळावेत.
वस्तुस्थिती काय आहे?
वित्तवर्ष २०२५-२०२६ मधील म्युचुअल फंडाच्या कामगिरीची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. (संदर्भ बिझिनेस लाईन ऑगस्ट १०, पान क्रमांक २)
विविध म्युच्युअल फंड कंपन्या जवळपास १८४० स्किम्स गुंतवणूकदारांना ऑफर करत आहेत. त्यात इक्विटी, डेट, हायब्रीड अशा सगळ्या स्किम्स मोडतात. या स्किम्सनी त्या वित्तवर्षात गुंतवणूकदारांना नक्की किती परतावा, रिटर्न मिळवून दिला असा प्रश्न विचारला तर निरुत्साही चित्र दिसू लागले आहे. वित्तवर्ष २०२५-२६ मधील आकडेवारी ; परतावा / रिटर्न आणि स्कीम्सची संख्या
निगेटिव्ह १० टक्के किंवा जास्त : ९३
निगेटिव्ह ५ आणि १० मध्ये : १४६
शून्य आणि निगेटिव्ह ५ मध्ये : ४९२
शून्य आणि पॉझिटिव्ह ५ मध्ये : ३७३
पॉझिटिव्ह ५ ते १० मध्ये : ५३९
दहापेक्षा जास्त : १९८
काही निरीक्षणे
१. निगेटिव्ह रिटर्न याचा मतितार्थ नीट समजून घेऊया. १०० रुपये मुद्दल गुंतवले असेल तर त्याचे मूल्य ९५ रुपये, ९० रुपये किंवा त्यापेक्षा कमी झालेले आहे. सार्वजनिक किंवा मोठ्या खाजगी बँकेत ठेवी ठेवल्या तर मुद्दल नक्कीच परत मिळणार असते
२. २०२५ या वित्तवर्षात २४३ स्किम्स मध्ये निगेटिव्ह परतावा मिळाला होता त्याच्या तुलनेत २०२६ च्या वित्तवर्षात निगेटिव्ह रिटर्न देणाऱ्या स्किम्सची संख्या तिप्पट होऊन ७३१ झाली आहे. म्हणजे एकूण स्कीमच्या ४० टक्के
३. बँक डिपॉझिट वर मिळू शकणाऱ्या परताव्याच्या तूलनेत किती म्युच्युअल फंड योजनांनी परतावा दिला ? तर तो असेल ४०० च्या आसपास. म्हणजे एकूण स्कीम्सच्या फक्त २० टक्के. ऐंशी टक्के स्कीम्स बँकेतील ठेवींपेक्षा कमी परतावा किंवा नुकसान करतात
अजून एक हे झाले रिटर्न बद्दल. पण आपल्या बचती ज्या ठिकाणी गुंतवतो तेथून किती परतावा मिळाला हा निकष पुरेसा नसतो.
उदा. आपली झोप ? त्याचे रुपयातील मूल्य किती काढणार ? म्युच्यअल फंडातील गुंतवणुकीचे मूल्य वरखाली होत असेल तर दिवसभर बेचैनी राहते ? त्याचे मूल्य किती काढणार ?
हे विशेषतः सिनियर सिटिझन्स साठी. ज्यांना या वयात स्वतः कष्ट करून / नोकरी करून वेगळे उत्पन्न नसते. फक्त आपल्या संचित बचतीवर मिळणारा परतावा हेच उत्पन्न असते. कोणत्याही परिस्थितीत मुद्दल खाल्ले जाणार नाही याची जमेल तेव्हढी काळजी घेतली पाहिजे.
ही पोस्ट बँक मुदत ठेवी विरुद्ध म्युच्युअल फंड असा कलगीतुरा लावण्यासाठी नाही. तर वित्त साक्षर होण्यासाठी मदत व्हावी यासाठी आहे .
भांडवल बाजार / म्युच्युअल फंड यांचा गतकाळातील परफॉर्मन्स भविष्यासाठी मार्गदर्शक नाही. गॅरंटी तर अजिबात नाही
खरेतर वरील आकडेवारी वर्तमानपत्रे / मीडिया यावर पूर्ण पान जाहिरातीसारखी आली पाहिजे ; त्यातून वित्त साक्षरता अधिक होईल.
म्युच्युअल फंड एक आयाम झाला. गेल्या पाच वर्षात आलेल्या आय पि ओ पैकी किती कंपन्या इश्यू price च्या खाली आहेत का वर यांची माहिती गुगल करा….
स्टॉक मार्केटचे अंधभक्त नसाल तर झोप उडेल
पण म्युच्युअल फंड किंवा आयपीओ वाल्या कंपन्या ती गोष्ट करणार नाहीयेत. कारण त्यांचा धंदा कमी होईल.
पण सेबी? जी सामान्य नागरिकांच्या हिताला बांधिल आहे? ती तर देव शकते जाहिराती. जसे रस्ते बांधणी मंत्रालय देते. पुढे घाट रस्ता, धोक्याचे वळण आहे…. करा विचार सेबी का करत नसेल ..






