– संजीव चांदोरकर
तूर्तास तरी आपण सर्वजण निश्वास सोडू शकतो…किमान दोन आठवडे ! (सर्वात महत्त्वाचे तेल आणि गॅसचा पुरवठा). नंतर माहित नाही.
गेल्या पंधरा महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःचे अनेक निर्णय वेळोवेळी फिरवले आहेत. त्यामुळे खुद्द अमेरिकेत आणि जगभर त्यांची “ट्रम्प ऑलवेज चिकन्स आऊट” (TACO) म्हणून खिल्ली उडवली गेली.
पण यावेळी मात्र सर्व जग मनोमन ट्रम्प यांनी “चिकन आऊट” व्हावे म्हणून प्राथर्ना करत होते. आणि खरेच ट्रम्प यांनी आपला ट्रॅक रेकॉर्ड अबाधित ठेवला.
ट्रम्प नेहमीप्रमाणे मीच जिंकलो म्हणून वल्गना करू देत. पण ग्राम्य भाषेत सांगायचे तर ट्रम्प घाबरले आहेत. एकाच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी. ते प्रचंड घाबरले आहेत!
जगातील सर्वात शक्तिमान लष्करी सामर्थ्य असणाऱ्या अमेरिकेच्या आणि इस्रायलच्या फटींमध्ये, तुलनेने खूप कमी लष्करी सामर्थ्य असणाऱ्या इराणने ड्रोन आणि मिसाईल जमेल तसे ठासले. एवढेच नाही तर अमेरिकेच्या लष्करी तळांना घर देणाऱ्या आखाती देशांना तसाच स्पष्ट मेसेज दिला. हे सर्वाना अनपेक्षित होते.
हवाई हल्ले करून इराण शरण येणार नाही आणि पुढच्या फेज मध्ये सैनिकांना जमिनीवर उतरवावे लागणार हे स्पष्ट होऊ लागले. माणसे मारणाऱ्या युद्धाकडे एक स्पोर्ट्स इव्हेंट म्हणून बघणाऱ्या ट्रम्प यांना अमेरिकेन सैनिक मेले असते तर व्यक्तिशः फार वाईट वाटले नसते. पण अमेरिकेतील “डोज हू मॅटर”, लष्करी अधिकारी आणि रिपब्लिकन नेत्यांना त्याचे गांभीर्य कळू लागले होते.
परकीय देशाविरुद्ध सशस्त्र युद्ध छेडण्याचा निर्णय अमेरिकन काँग्रेसच्या अखत्यारीत येतो. तांत्रिकदृष्ट्या भविष्यात हे युद्ध बेकायदेशीर कृत्य ठरू शकते. आणि त्यात सहभागी झालेल्या अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांवर त्याचा ठपका येऊ शकतो हे उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांना उमजू लागले होते. ते अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार युद्ध गुन्हेगार ठरू शकले असते. त्यावेळी ट्रम्पच्या मागे लपू शकले नसते. कारण त्यांची बांधिलकी राष्ट्राध्यक्ष एवढीच अमेरिकन घटनेला देखील असते. लष्करात बंड झाले असते असे नाही, पण निरनिराळ्या मार्गाने अनिच्छेचे परिणाम लष्करी कारवाईत उमटू लागले असते.
ट्रम्प यांना मार्केटची भाषा चांगली कळते. इराण वरच्या युद्धाच्या गेल्या ४० दिवसात अमेरिकेतील रोखे आणि शेयर मार्केट प्रतिक्रिया देत होते. खनिज तेल १२० डॉलर प्रति बॅरल स्पर्श करून आले. आणि युद्ध बराच काळ सुरूच राहिले तर २०० डॉलर पर्यंत जाईल हे सांगितले गेले. अमेरिकेतील गॅसोलिनच्या किंमती ऐतिहासिक उंचीवर गेल्या. महागाई वाढू लागली आणि त्याची झळ कुटुंबांना बसू लागली होती.
युद्धावर अमेरिकेचा दररोज दोन बिलियन डॉलर खर्च होत होता. आणि दीर्घकालीन युद्धात अमेरिकच्या डोक्यावरील ओझे वाढणार होते. जो डोलारा उद्या कोसळू शकला असता.
ट्रम्प काही आकाशातून पडून राष्ट्राध्यक्ष झाले नव्हते. त्यांना राष्ट्राध्यक्ष बनवणाऱ्या सर्वच पाठीराख्यात प्रचंड अस्वस्थताच नाही तर चीड तयार होत होती. त्यांच्या मागा आंदोलनातील खंदे समर्थक जाहीरपणे निर्भर्त्सना करू लागले. प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी सोडून चालले होते. अमेरिकेच्या ३००० शहरांमध्ये ९० लाख नागरिक रस्त्यावर उतरणे याचे नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुकीत परिणाम होणार आहेत. त्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे संसद आपापल्या जागा गमावू शकतात. त्यांना ट्रम्प पेक्षा अर्थातच आपापले राजकीय करीयर अधिक प्रिय आहे. अमेरिकेचे अनेक दशकांची “नाटो” मित्र राष्ट्रे, जी त्यांच्या आयात करामुळे आधीच त्रस्त होती, अमेरिकेपासून अजून दूर गेली. खुद्द उपाध्यक्ष व्हॅन्स दूर राहू लागले होते.
ट्रम्प एकटे पडत चालले होतेच. त्यांच्या मानसिक आरोग्याबद्दल आणि निर्णय क्षमतेबद्दल जाहीर चर्चा होऊ लागल्या होत्या. इराणने अमेरिकेसमोर आणि जगासमोर ट्रम्प यांचे उरलेले कपडे फेडावयास सुरुवात केली होती.
ही पार्श्वभूमी आहे ट्रम्प यांनी दोन आठवड्याची युद्धबंदी जाहीर करण्याची.
दोन आठवड्यात नक्की काय होईल ? माहित नाही. अनेक प्रश्न आहेत. पण एक गोष्ट नक्की. दोन आठवड्यानंतर देखील २८ फेब्रुवारी रोजी ट्रम्प यांच्यात वळवळणारा जो किडा आता निपचित पडला आहे त्याच्यात पुन्हा युद्ध छेडण्याचे त्राण नसेल
सर्वात खतरनाक आहे दुसरा अघोरी राज्यकर्ता नेत्यानाहू. तो काहीच करु शकतो. गेल्या २४ तासात इस्रायलने लेबनॉनवर बॉम्ब वर्षाव सुरूच ठेवला आहे.






