काल २ मे रोजी आसाम, केरळ, बंगाल, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. आसाम मध्ये भाजप, केरळ मध्ये डावे, तामिळनाडू मध्ये डीएमके, बंगाल मध्ये तृणमूल काँग्रेस तर पुद्दुचेरी मध्ये एआयएनआरसी या पक्षांचा विजय झाला आहे.
बंगालची निवडणूक जिथे प्रधानमंत्री मोदी यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती तिथे भाजपचा पराभव झाला आहे. बंगाल मध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनि तिसऱ्यांदा विजय मिळवून आपली सत्ता टिकवण्यात यश मिळविले आहे. तृणमूल काँग्रेसने २१३ जागी विजय मिळवून भाजपला ७७ जागांवर थांबवले आहे. अत्यंत अटीतटीच्या सामन्यात ममता बॅनर्जी यांचा भाजपच्या शुभेन्दू सरकार यांनी नंदीग्राम मतदारसंघातून १७३७ मतांनी पराभव केला. बंगाल मध्ये आश्चर्यकारक पणे डाव्यांचा आणि काँग्रेसचा सुपडा साफ झालेला आहे. विरोधी पक्ष असलेल्या डाव्यांच्या आणि काँग्रेसच्या आघाडीला एकही जागा जिंकता आलेली नाही. डाव्यांच्या आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी ममता बनर्जींना हरविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाजपला मदत केल्याचे बंगाल मध्ये बोलल्या जात आहे. या निकालास बंगालमध्ये डाव्यांचा अस्त म्हणून पाहिले जात आहे. नंदीग्राम येथून निवडणूक हरल्यामुळे ममता बॅनर्जी पुन्हा मुख्यमंत्री होतील की इतर कुणास मुख्यमंत्रीपदी बसवतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
केरळ मध्ये ९७ जागा जिंकून डाव्या आघाडीने (LDF) पुन्हा विजय मिळविला आहे तर काँग्रेस आघाडी (४१) जागांसह यावेळेसही पराभूत झाली आहे. केरळ मध्ये भाजपला विशेष काही करता आलेले नाही, भाजपला केरळमध्ये एकही जागा जिंकता आलेली नाही. केरळच्या जनतेने भाजपला स्पष्टपणे नाकारले आहे. काँग्रेस सोबत आघाडीत असलेल्या ऑल इंडिया युनायटेड मुस्लिम लीग हा पक्ष सुद्धा थोड्याबहुत फरकाने आपल्या जागा टिकविण्यात यशस्वी झाला आहे. लोकसभा निवडणुकीत २० पैकी १९ जागा जिंकणाऱ्या काँग्रेस आघाडीचा असा दयनिय पराभव का झालाय याचे चिंतन काँग्रेसला करावे लागणार आहे. केरळ मध्ये काँग्रेसला फक्त २१ जागा मिळाल्या आहेत. प्रत्येक राज्यात कमी होत असलेल्या जागा हा काँग्रेससाठी फार मोठा चिंतेचा विषय आहे.
आसाम हे निवडणूक झालेल्या पाच राज्यांपैकी एकमेव असे राज्य होते जिथे भाजप सत्तेमध्ये होता. भाजपने ६० जागांवर विजय मिळवला आहे तर भाजपची सहयोगी असलेल्या आसाम गण परिषदेला ९ जागा मिळाल्या आहेत. भाजप आघाडी आसाम मध्ये आपली सत्ता कायम राखण्यात यशस्वी झालेली आहे. काँग्रेस आघाडीत सामील असलेल्या पक्षांपैकी काँग्रेसला २९ तर AIUDF हा पक्ष १६ जागांवर विजयी झालेला आहे.
डीएमके पक्षाचे करुणानिधी आणि एआयडीएमकेच्या जयललिता या दोघांच्या निधनानंतर होत असलेल्या या पहिल्या निवडणुकीत डीएमके पक्ष विजयी झाला आहे. मागच्या १० वर्षापासून सत्तेत असलेल्या एआयडीएमकेला हरवून स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली डीएमकेने १३३ जागा मिळविल्या आहेत तर एआयडीएमकेला ६० जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेस यावेळी डीएमके पक्षासोबत युतीमध्ये होता, तर भाजपने एआयडीएमके सोबत युती करून ही निवडणूक लढविली. मागच्या विधानसभेत शून्यावर असलेल्या भाजपला यावेळी ४ जागांवर विजय मिळाला आहे. तामिळनाडू मध्ये आंबेडकरवादी पक्ष म्हणून ओळख असलेल्या VCK या पक्षाला ४ जागांवर विजय मिळाला आहे, खासदार थोल थिरुमावलन यांच्या नेतृत्वात जिंकलेल्या या जागांमुळे थोल थिरुमावलन यांचे वजन राजकारणात मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
काँग्रेस आणि डीएमके आघाडीची सत्ता असलेल्या पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रपती राजवट होती. निवडणूक जाहीर झाल्यानंतर पडलेल्या फुटीमुळे सत्ताधारी आघाडी विश्वासमत ठराव जिंकण्यास असमर्थ ठरली होती त्यामुळे पुद्दुचेरी मध्ये राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती. पुद्दुचेरी मध्ये झालेल्या तीस जागांच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री रंगनाथन यांचा एआयएनआरसी (१०) आणि भाजप(६) आघाडी १६ जागांवर विजयी झाले आहेत तर डीएमके आणि काँग्रेस युतीला फक्त ८ जागांवरच विजय मिळविता आला आहे. पुद्दुचेरी मध्ये ११ जागा असलेल्या काँग्रेसला फक्त दोनच जागा मिळाल्या आहेत.
पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांच्या निकालावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे आसाम सोडून इतर राज्यांमधील जनतेने भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना नाकारून प्रादेशिक पक्षांना पसंती दिलेली आहे. पाच राज्यांच्या या निकालावरून प्रादेशिक पक्षांना पुन्हा एकदा देशातील राजकारणात महत्व प्राप्त झाले आहे. काँग्रेस पाच पैकी पाचही राज्यात माघारलेली दिसते आहे, भाजप सोबतच्या लढाईत काँग्रेसने मागे राहून प्रादेशिक पक्षांना पुढे करावे याचे स्पष्ट संकेत या निवडणूक निकालांमधून मिळालेले आहेत.