– संजीव चांदोरकर
पुन्हा एकदा एपस्टीन ; ज्याचे नाव टाइप केले तर कीबोर्ड आणि स्क्रीनवरून गु घाण वास यायला लागतो.
अनेकानेक कोवळया मुलींचे रक्त, मांस, स्वप्ने यांच्या घृणास्पद चिखलात लोळून, सिव्हिलायझेशनच्या सर्व मर्यादांना फाट्यावर मारणारा, ब्लॅकमेलिंग वर चालणारा जागतिक एलिट / राज्यकर्त्या व्यक्तींचा एपिस्टीन नेटवर्क सेक्स क्लब !
नवउदारमतवादाने आपला ब्रेनवॉश केला की त्यांची प्रणाली मेरिट बेस्ड , कायद्याला धरून कार्यरत असते. वस्तुस्थिती वेगळी आहे. पैशाकडे पैसा जातो हे काळाच्या कसोटीवर उतरलेले वचन नवउदारमतवादी युगात देखील पुढे सुरु आहे.
त्यासाठी नवउदारमतवादाने वेगळे प्रारूप तयार केले. पैसा अधिक माहिती अधिक सर्व क्षेत्रातील उच्चपदस्थ व्यक्तींमधील व्यक्तिगत संबंध म्हणजे नफा कमवण्याच्या अमर्याद संधी असे नवीन समीकरण प्रस्थापित केले.
यातील व्यक्तींचे प्रभावक्षेत्र ते चालवत असलेल्या संस्थेपुरते / क्षेत्रापुरते मर्यादित नसते. त्यांना सारे जगच आपल्या बुडाखाली हवे असते. त्यासाठी त्या एकट्या नाहीत नेटवर्क मध्ये काम करतात.
समाजशास्त्रांमध्ये अतिशय गुंतागुंतीच्या संरचना समजून घेण्यासाठी नेटवर्क थियरीचा वापर केला जातो. चाकाच्या मध्यभागी जसा तुंबा (इंग्रजीमध्ये हब) तसाच प्रत्येक नेटवर्कच्या केंद्रस्थानी हब असतो. नेटवर्क जेवढे गुंतागुंतीच तेवढे हबचे महात्म्य मोठे. एपस्टीन या घृणास्पद सेक्स क्लबच्या केंद्रस्थानचा हब होता.
जगातील दहा प्रभावशाली व्यक्ती एखाद्या क्लब मध्ये जमत असतील. तर अकरावी प्रभावशाली व्यक्तीला देखील तेथे जाण्यासाठी ते कारण पुरेसे असते. आणि मग तेच लॉजिक बाराव्या , तेराव्या व्यक्तीला देखील लागू पडत जाते.
सामान्य नागरिकांच्या भ्रष्टाचाराच्या कल्पना खोके / पेट्यांपुरत्या मर्यादित असतात ;
पण जागतिक प्रस्थापित वर्गाचा खरा भ्रष्ट आचार विविध देशातील विविध धोरणांवर, राबवल्या जाणाऱ्या महाकाय भांडवल सघन प्रकल्पांवर आपल्या आर्थिक साम्राज्याला हवा तसा निर्णायक आकार देणे हा असतो. जागतिक प्रणाली नक्की चालते हे या व्यक्तींना माहीत असते कारण तेच या प्रणालीचे चालक मालक असतात.
या भ्रष्टाचारात स्टेकला लागलेले पैसे मिलियन्स / बिलियन्स डॉलर्समध्ये असतात. सर्व खोके / पेट्यामार्फत लाच म्हणून दिल्या जाणाऱ्या एकत्रित पैशाची गोळाबेरीज केली तर ती एक शतांश देखील भरणार नाही.
कोणते काम करण्यासाठी कोणती व्यक्ती उपयुक्त आहे ? ती आपल्या किती कह्यात येऊ शकेल ? कोणती लिव्हर / कोणती कळ दाबली की कोणता दरवाजा उघडू शकतो ? कोणत्या देशाची कोणती आर्थिक धोरणे अडथळा आहेत ? ती कशी बदलता येतील ? कोणते महाकाय प्रकल्प देशांच्या गळी उतरवता येतील ?
या सगळ्याची माहिती केंद्रस्थानच्या हब कडे चहुबाजूने येत राहते. केंद्रस्थानाचे माहात्म्य exponentially वाढत जाते. आणि तो मॅच मेकिंगचे काम करू लागतो
सामील झालेली व्यक्ती आपल्या क्लबमध्ये पूर्णत्वाने सामील कशी होईल ? अर्धवट साथ सोडून जाणार तर नाहीना ? बाहेर जाऊन आपल्या क्लबचे बिंग तर फोडणार नाही ? याची काळजी केंद्रस्थानचा हब घेत असतो.
इथे ब्लॅकमेलिंग हा कळीचा शब्द बनतो. ३० लाख विविध प्रकारच्या रेकॉर्ड्सच्या आकड्याचे मग अर्थ लागतात.
ही सिस्टीम कशी चालते, कोणत्या टोकाला जाऊ शकते, त्याची अंतरदृष्टी मिळवण्यासाठी अर्थ लावावे लागतील.





