इम्फाळ: मणिपूरमधील उखरूल जिल्ह्यातील लिटान सारेइखोंग गावात सोमवारी (दि. ९) दुपारी पुन्हा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. काही सशस्त्र गटांनी गावातील घरांना आग लावल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे अनेक ग्रामस्थांना आपली घरे सोडून शेजारच्या कांगपोकपी जिल्ह्यातील सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला आहे.
या संघर्षाची सुरुवात तंगखुल नागा समाजातील एका व्यक्तीवर ७ ते ८ जणांनी हल्ला केल्यानंतर झाली. हा वाद लिटान सारेइखोंगचे गावप्रमुख आणि पीडित पक्ष यांच्यात पारंपरिक पद्धतीने मिटवण्याचे ठरले होते. मात्र रविवारी नियोजित बैठक होऊ शकली नाही. त्यानंतर सिकिबुंग गावातील काही लोकांनी गावप्रमुखाच्या घरावर हल्ला केल्याचे सांगितले जाते. (Manipur News)
रविवारी संध्याकाळी तंगखुल नागा आणि कुकी समाजातील सदस्यांमध्ये दगडफेक झाली. त्यानंतर रात्री उशिरा कुकी बंडखोरांकडून तंगखुल समाजाच्या घरांना आग लावण्यात आली. या घटनेच्या प्रत्युत्तरादाखल कुकी समाजातील काही घरांचेही नुकसान झाले.
या दरम्यान काही सशस्त्र टोळ्यांनी अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करत हवेत गोळीबार केल्याने परिसरात दहशत पसरली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने उखरूल जिल्ह्यात रविवारीच संचारबंदी लागू केली आहे. महादेव, लंबुई आणि शांगकाई यांसारख्या संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. (Manipur News)
तंगखुल ही मणिपूरमधील सर्वात मोठी नागा जमात असून लिटान सारेइखोंग हे कुकीबहुल गाव आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले जात असले, तरी तणाव कायम आहे.






