ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले कौतुक !
Under 19 World Cup 2026 : भारतीय युवा ब्रिगेडने पुन्हा एकदा दाखवून दिले की क्रिकेटच्या दुनियेत ‘किंग’ कोण आहे! आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप 2026 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 100 धावांनी धुव्वा उडवत सहाव्यांदा विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. वैभव सूर्यवंशीचे तुफानी दीडशतक आणि गोलंदाजांच्या शिस्तबद्ध कामगिरीच्या जोरावर भारताने हा ऐतिहासिक विजय साकारला.
वैभवचा ‘सूर्या’ तळपला; भारताचा धावांचा डोंगर
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित षटकात तब्बल 411 धावांचा डोंगर उभारला. या डावाचा खरा हिरो ठरला तो वैभव सूर्यवंशी. वैभवने केवळ 80 चेंडूत 175 धावांची विरारोहक खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 15 चौकार आणि 15 उत्तुंग षटकार खेचले. त्याला आयुष म्हात्रे (53 धावा) आणि अखेरच्या षटकांत कनिष्क चौहानने (20 चेंडूत 70 धावा) दिलेल्या वादळी साथीमुळे भारताला 400 पार मजल मारता आली. (Under 19 World Cup 2026)
412 धावांच्या मोठ्या लक्षाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. जोसेफ मूरस अवघ्या 17 धावांवर माघारी परतला. बेन मेयेस (45) आणि थॉमस रिव्ह्यू (31) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण ते मोठी खेळी करू शकले नाहीत.
सलामीवीर बेन डॉकिन्सने 66 धावांची खेळी करत एक बाजू लावून धरली होती. तर इंग्लंडकडून सेलेब फॉल्कनरने 115 धावांची झुंजार शतकी खेळी करत भारताच्या गोटात काही काळ भीती निर्माण केली होती. मात्र, तो बाद होताच इंग्लंडचा डाव पत्त्यासारखा कोसळला आणि संपूर्ण संघ 311 धावांवर गुंडाळला. (Under 19 World Cup 2026)
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले कौतुक
भारतीय युवा संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरल्यानंतर जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनीही या विजयाची दखल घेत खेळाडूंचे अभिनंदन केले. ‘भारतीय संघाने अंडर-१९ विश्वचषकात मिळवलेला हा विजय अत्यंत शानदार आहे,’ अशा शब्दांत त्यांनी टीम इंडियाचे कौतुक केले आहे.





