पुणे : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा वर्धापन दिन वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ (मुंडे) आणि पुणे शहर पोलीस अप्पर आयुक्त मनोज पाटील उपस्थित होते. मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.

कार्यक्रमात बोलताना समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ (मुंडे) म्हणाल्या की, “सामाजिक न्याय विभागाच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी विभाग कटिबद्ध आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीने सक्रिय सहभाग नोंदवून महत्त्वाची भूमिका बजावावी.”
पुढे पोलीस अप्पर आयुक्त मनोज पाटील यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “संविधानाचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. संविधानामुळेच आपल्याला सन्मानाचे जीवन मिळाले आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपले सदैव प्रेरणास्थान राहतील.”

कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांनी पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस प्रशासनाचे कौतुक केले. तसेच, सामाजिक न्याय विभागाने वंचित घटकांसाठीच्या योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या सोहळ्याला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महासचिव ॲड. प्रियदर्शी तेलंग, विशाल गवळी, ऋषिकेश नांगरे पाटील, शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे, शहर उपाध्यक्ष जॉर्ज मदनकर, राजा ढाले, पंचशील चौरे यांच्यासह आरती सिंग, कल्याणी शेलार, निवास दासारी, हरि वाघमारे, अकबर सय्यद राजे आणि अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी. पी. सावळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सतीश रणवरे यांनी मानले.






