नाशिक : प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस परेड मैदान, नाशिक येथे कार्यक्रमात एक लाजिरवाणा प्रकार पाहायला मिळाला. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणादरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही, यामुळे वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यांनी तिथे आक्षेप घेतला.
महिला कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का वगळले असा थेट सवाल केला. त्यावर पोलिसांनी त्यांना तातडीने बाहेर काढले. यामुळे एकच संतापाची लाट उसळली आहे. (Vanchit bahujan aghadi)
नेमकी घटना काय?
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांचे भाषण सुरू असताना, दर्शना सौपुरे (वनरक्षक) आणि माधुरी जाधव (वनविभाग) या महिला कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला. महाजन यांनी आपल्या भाषणात महापुरुषांचा उल्लेख करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव का वगळले? असा थेट सवाल या महिलांनी उपस्थित केला. (Republic day)
महिला कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत त्यांना घोषणाबाजी करण्यापासून रोखले. महिलांना घोषणा देताना रोखण्याचे प्रयत्न यावेळी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेऊन बाजूला केले. महिला कर्मचाऱ्यांना पोलिस स्टेशनला नेण्यात आले आहे. (Vanchit bahujan aghadi)

वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा –
या घटनेनंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. वंचित बहुजन आघाडीने या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचे समर्थन केले असून, “आम्ही या धाडसी बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असे जाहीर केले आहे. महापुरुषांचा अवमान किंवा त्यांना डावलण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही पक्षाकडून देण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नाशिक कमिटीने तातडीने पोलीस स्टेशनमध्ये जात त्या महिलांना धीर दिला आणि समर्थन दिले. त्यावेळी त्यांचा सन्मान सुद्धा करण्यात आला. (Republic day)
“ज्यांच्यामुळे आज आपण हा लोकशाहीचा उत्सव साजरा करत आहोत, त्या राज्यघटनाकारांचे नाव भाषणात न येणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही केवळ आमचा हक्क आणि सन्मान मागितला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना समानतेचे हक्क दिले आणि भारताला संविधान दिले. मात्र, मंत्र्यांच्या भाषणात बाबासाहेबांचे नाव नसणे ही लाजिरवाणी बाब आहे. मला माझ्या नोकरीची पर्वा नाही; बाबासाहेबांचे नाव पुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात आम्ही वेळोवेळी आवाज उठवू. त्यांची ओळख आम्ही कधीही पुसू देणार नाही. मला निलंबित (Suspend) केले तरी चालेल, पण आज पालकमंत्री ज्या पदावर आहेत, ते देखील केवळ संविधानामुळेच आहेत, हे विसरता कामा नये.” असे दर्शना सौपुरे आणि माधुरी जाधव या महिला कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला. Republic day)






