नांदेड: नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. महानगरपालिकेतील वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकत्र येत ‘लोक न्याय विकास आघाडी’ या संयुक्त आघाडीची स्थापना केली आहे. या नवनिर्वाचित आघाडीच्या गटनेतेपदी वंचित बहुजन आघाडीचे इंजि. प्रशांत इंगोले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

औरंगाबाद विभागीय आयुक्तालय येथे या निवडीची अधिकृत प्रक्रिया पार पडली. नांदेड महानगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी शहराच्या विकासासाठी आणि जनतेला न्याय देण्यासाठी ही संयुक्त आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

या महत्त्वपूर्ण निवडीच्या वेळी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंजि. प्रशांत इंगोले यांच्याकडे गटनेतेपदाची धुरा सोपवण्यात आल्याने, आता महानगरपालिकेत ही नवीन आघाडीची जोरदार चर्चा रंगली आहे. महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर प्रस्थापितांना चांगलाच धक्का बसला आहे.






