ज्या रस्त्यांवरून चालताना ड्रेनेजच्या उंचसखल झाकणांमुळे पुणेकरांच्या मणक्यांची ‘रंगीत तालीम’ व्हायची, तेच रस्ते आज आरशासारखे चमकू लागले आहेत. निमित्त काय, तर म्हणे ‘बजाज ग्रँड टूर’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा!
सकाळी कामाला बाहेर पडल्यानंतर नागरिक चकित झाले. रस्त्यांच्या कडेला रोपे, पाट्या, कुंड्या, रस्त्यात करण्यात आलेले रंगरंगोटी पाहण्यास मिळाले. bajaj grand tour)
पुण्यात पार पडलेल्या ‘बजाज सायकल टूर’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले खरे, पण त्यापेक्षा जास्त चर्चा रंगली ती तेथील सुव्यवस्थेची! ही स्पर्धा पाहताना पुणेकर चकित झाले. सायकल स्पर्धेसाठी प्रशासनाने केलेली तयारी अत्यंत देखणी आणि नियोजनबद्ध होती. मात्र, यावरूनच आता नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. नागरिकांकडून मोठे प्रश्न उपस्थित करण्यात आले.
नेहमी अशी स्वच्छता का नसते? असा सवाल करण्यात आले. सायकल स्पर्धेसाठी जे रस्ते रातोरात चकाकले, झाडझुडपे लावण्यात आली आणि कुंड्यांनी रस्ते सजले, तशी परिस्थिती पुणेकरांसाठी दररोज का नसते? तसेच अनेक ठिकाणी रस्ते खराब होते आणि कचऱ्याचे साम्राज्य होते. मात्र, स्पर्धा जाहीर होताच हे सर्व प्रश्न सुटले. मग प्रशासनाला हे काम आधी का सुचले नाही? केवळ आंतरराष्ट्रीय किंवा मोठ्या स्पर्धांसाठीच पुणे ‘स्वच्छ’ होणार का? (bajaj grand tour)
शहरातील खराब रस्ते आणि कचरा नियोजनाचे अपयश लपवण्यासाठी प्रशासनाने हा तात्पुरता ‘मेकओव्हर’ केला का, असा प्रश्न आता सर्वसामान्य पुणेकर विचारत आहेत. यावेळी “अशा स्पर्धा दर महिन्याला घ्याव्यात, जेणेकरून प्रशासनाच्या धाकाने का होईना, पुणेकरांना स्वच्छ पुणे पाहायला मिळेल.” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून करण्यात येत आहे.
रस्त्यांवरील साफसफाई, नवीन रंगरंगोटी आणि दिशादर्शक पाट्या लावून प्रशासनाने आपली क्षमता सिद्ध केली आहे. पण हीच तत्परता सामान्य करदात्यांच्या दैनंदिन सोयीसाठी का दाखवली जात नाही? प्रशासनाला आपल्या कामाचे प्रदर्शन करण्यासाठी केवळ स्पर्धांचीच वाट पाहावी लागते का, ही खेदाची बाब आहे.





