लेखक – प्रा.डॉ. किशोर वाघ
“भीमा तुझ्या पिढीचा आवाज मीच आहें दारातला तुझ्या तो गजराज मीच आहे गायक कवी प्रणेता जेत्या मधील जेता काहीच काल नव्हतो तो आज मीच आहें “
– महाकवी वामनदादा कर्डक
फुले शाहू आंबेडकरी विचारांचे प्रवाहक म्हणून निष्ठावंतपणे काम करणारा एक सगळ्यात महत्त्वाचा वर्ग म्हणजे आंबेडकरी कवीगायक व शाहीर होय. “माझी 10 भाषणे तर शाहिराचा एक जलसा” अशी प्रशस्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खुद्द शाहिरांना दिली. बाबासाहेबांच्या काळात व बाबासाहेबांच्या नंतर सुद्धा अतिशय निष्ठेने, उपाशी राहून व प्रामाणिकपणे गायकांनी सर्व आघाडीवर प्राण पणाला लावून या चळवळीचं काम केलेलं आहे. परंतु कायमस्वरूपी गायक कवी आणि शाहीर हे फक्त राजकीय नेते व कार्यकर्त्यांना लोक गोळा करण्याचे साधन म्हणून दिसले. त्यामुळे अतिशय प्रतिभा प्रतिभावान कवी गायक शाहिरांनी प्रसिद्धी मिळवली परंतु पैसा मिळाला नाही. वेळप्रसंगी त्यांचा आंबेडकरी चळवळीत धुर्त लोकांनी कायम वापर केला.
वामनदादांसारख्या व्यक्तीला सुद्धा उपाशी -तापाशी राहून दोन वेळेस टीबी सारखा गंभीर आजाराशी झगडावे लागले. तरीसुद्धा त्यांनी आपली निष्ठा विकली नाही. कायमस्वरूपी बुद्ध फुले शाहू कबीर व बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला बांधील राहून शेवटच्या श्वासापर्यंत काम केले. आजही वामनदादांचा वसा व वारसा घेऊन प्रतापसिंगदादा बोदडे यांच्यापासून पासून ते आजही खेड्यापाड्यात, वाड्या वस्तीवर, छोट्या छोट्या पारावर, गावांमध्ये गायनाच्या माध्यमातून शाहीर कवी गायक काम करताना दिसतात. परंतु हा वर्ग अतिशय हातावर आणून पानावर खाणारा वर्ग आहे. आणि खऱ्या अर्थाने तोच निष्ठावंत आहे. हा वर्ग आपापली कामधंदे करून पुन्हा प्रबोधनाचं काम बाबासाहेबांच्या काळापासून अद्यापपर्यंत निर्व्याजपने करत आहे. परंतु तरीसुद्धा हा वर्ग कायमस्वरूपी आमच्या स्वार्थी व धूर्त राजकारणामुळे आर्थिक दृष्ट्या पंगू झाला आहे.
आमच्या खूप थोड्या राजकीय लोकांनी कलाकारांना जोपासलेले दिसते. आज पर्यंत या कवी गायक शाहिरांचा फक्त आणि फक्त वापर करणे, गर्दी जमवणे, सभा सुरू झाल्यानंतर लगेच शहराचं गाणं बंद करून त्याला सबबॉर्डीनेट भूमिका देणे. हे चालूच होते व चालूच राहणार आहे. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या रूपाने गोरगरीब सर्वसामान्य माणसाला राजकीय स्वप्न पडायला लागलेली आहे. ही लोकशाही जिवंत करणारी घटना आहे. याचाच एक भाग म्हणून अतिशय गरिबीतून व संघर्षातून पुढे आलेले एक नाव, निष्ठावंतपणे आंबेडकरी गाण्याला वाहून घेतलेला कलावंत , वंचित बहुजन आघाडीची चळवळ सुरू झाल्यापासून त्या चळवळीत कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता झोकून देणारा कलावंत म्हणजे शाहीर मेघानंद जाधव होय.
बाळासाहेबांच्या चमत्कारामुळे एक सर्वसामान्य घरातला कवी -गायक, निष्ठावंत आंबेडकर विचाराचा खंबीर कार्यकर्ता, गरीब माणूस, झोपडीतला माणूस शाहीर मेघानंदाच्या रूपाने निवडून येतो. ही खऱ्या अर्थाने किमयाच आहे. कोट्यावधी रुपयांची माया असलेली लोक एकीकडे, मसल पावर असलेली लोक,एकीकडे अनैतिकतेने ओतप्रोत भरलेली लोक एकीकडे तर दुसरीकडे आपली फकीरी फाटकी झोळी घेऊन निवडून आलेला अवलिया मेघानंद जाधव आहें. माझा मित्र भाऊ चळवळीतला सहकारी निवडून आला याबद्दल मनस्वी आनंद आहे. कारण हा खऱ्या अर्थाने आम्हा सर्व कवी गायकांचा प्रतिनिधी आहे. हा प्रतिनिधी निश्चितच गाण्याच्या रूपाने महाराष्ट्रात आंबेडकरी आवाज बुलंद करणारा शाहीर छत्रपती संभाजी नगरची महानगरपालिका गदा गदा हलवल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास आम्हाला आहे.
छत्रपती संभाजीनगर हे फुले शाहू आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या निष्ठावंत लोकांचा गड म्हणून ओळखला जाणारयात शंका नाही. सर्वसामान्य माणसांना सभागृहात पोहोचवणारे ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना व युवा नेतृत्व सुजात आंबेडकर यांना खूप खूप धन्यवाद!
“असो वा नसो काहीच आता माझ्या फाटक्या फकीरी झोळीत तरी शेवट पर्यंत भीमराव राहील माझ्या गीताच्या ओळीत ” !! धृ
-शाहीर मेघानंद जाधव





