लातूर : महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने लातूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या भव्य जाहीर सभेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी देखील वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराला जनतेने तुफान प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे ॲड. बाळासाहेब आंबेडकर, प्रा. अंजलीताई आंबेडकर, सुजात आंबेडकर यांनी केलेल्या धडाकेबाज प्रचारामुळे मुंबई, औरंगाबाद, पुणे, लातूरसह सगळीकडे वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने चांगले वातावरण आहे. त्यामुळे राज्यातील मतदार वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी असून, महानगरपालिका निवडणुकीत निश्चित परिवर्तन होण्याची आशा कार्यकर्त्यांमध्ये आहे.
“स्वतःला विश्वगुरु म्हणवून घेणाऱ्यांचा माज उतरवण्यासाठी तिसऱ्या शक्तीची गरज नाही, तर भारतीय मतदारच त्यासाठी सक्षम आहेत,” असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
युद्धाचे सावट आणि मतदारांची ताकद
सभेला संबोधित करताना आंबेडकर म्हणाले की, सध्या देशात युद्धाची चर्चा सुरू आहे. भारतीय सैन्य प्रमुखांनी आगामी दोन-तीन महिन्यांत युद्धाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, हे युद्ध थांबवणे सर्वसामान्यांच्या हातात आहे. “या देशाचे खरे मालक मतदार आहेत. जर तुम्ही मतदानातून योग्य निर्णय घेतला, तर युद्धाची परिस्थितीच उद्भवणार नाही,” असे आवाहन त्यांनी केले.
आंतरराष्ट्रीय राजकारणावर भाष्य करताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “ट्रम्प म्हणतात की स्वतःला विश्वगुरु म्हणवून घेणाऱ्या मोदींचा माज मी मोडल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्याला ट्रम्पला हे सांगायचं आहे की, तुला युद्ध करण्याची किंवा माज मोडण्याची गरज नाही. आम्ही भारतीय मतदार मतदानाच्या माध्यमातूनच हा माज मोडून काढू शकतो.”
महानगरपालिका निवडणूक जरी स्थानिक प्रश्नांवर असली, तरी या निवडणुकीच्या माध्यमातून देशाला आणि जगाला मोठा संदेश देण्याची ही वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले. “महानगरपालिकेच्या निवडणुकीत असा कौल द्या की, ट्रम्पलाही समजले पाहिजे की भारतीय जनताच सत्ताधाऱ्यांचा माज उतरवण्यास समर्थ आहे,” असेही ते म्हणाले.
या सभेला लातूरमधील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






