पिंपरी-चिंचवड : “भारतीय जनता पक्षाचा देशामध्ये एकाधिकारशाही आणण्याचा डाव असून, त्यांना चीनसारखी परिस्थिती निर्माण करायची आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे कंबरडे मोडा आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा,” असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ आयोजित भव्य जाहीर सभेत ते बोलत होते.
संविधान बदलण्याचा भाजपचा डाव
ॲड. आंबेडकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “भाजपचा निश्चय पक्का आहे की या देशात फक्त एकाच पक्षाचे राज्य राहिले पाहिजे आणि इतर सर्व पक्ष संपले पाहिजेत. जिथे कोणालाही विरोधाचा आवाज उठवता येणार नाही, अशी चीनसारखी परिस्थिती त्यांना भारतात आणायची आहे. एकदा का एका पक्षाचे राज्य आले की, हे लोक देशाचे संविधान कधीही बदलू शकतात.”

उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनतेची लूट
देशाच्या आर्थिक धोरणांवर भाष्य करताना आंबेडकर म्हणाले की, “परदेशातील आयात-निर्यातीतून होणारा नफा भारतीय जनतेच्या हितासाठी वापरला जात नाही. ४० हजार कोटींचा नफा भारताच्या तिजोरीत जाण्याऐवजी तो थेट अंबानींसारख्या उद्योगपतींच्या खिशात घातला जात आहे. मोदी आणि ट्रम्प यांच्यात केवळ अहंकाराचे भांडण सुरू असून त्याचा फटका देशाला बसत आहे.”
माध्यमांच्या गुलामगिरीवर टीका
प्रसारमाध्यमांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करताना त्यांनी नमूद केले की, “आज देशातील मोठ्या वर्तमानपत्रांचे आणि टीव्ही चॅनेलचे मालक मोदींचे गुलाम झाले आहेत. सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडण्याऐवजी ते सत्तेची चाकरी करत आहेत. मला कितीही विरोध झाला तरी मी कोणालाही घाबरणार नाही. जे सामान्य जनतेला गुलाम करायला निघाले आहेत, त्यांना धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे.”

‘वंचित’ला विजयी करण्याचे आवाहन
अमेरिकेने मोदींच्या विरोधात १२ वर्षांपूर्वी काढलेल्या अरेस्ट वॉरंटची आठवण करून देत, आंबेडकरांनी भाजपच्या हुकूमशाही प्रवृत्तीवर प्रहार केला. “देश आणि लोकशाही वाचवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या विरोधात मतदान करा. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या,” असे आवाहन त्यांनी केले.

पिंपरी चिंचवड येथील ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेत जनसागर उसळला होता. या सभेला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच नागरिकांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. या जाहीर सभेला पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिक, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






