अमरावती : अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर आज अमरावती दौऱ्यावर आहेत. शहरातील विविध भागांत सुजात आंबेडकर यांच्या प्रचार सभा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सुजात आंबेडकर यांच्या जाहीर सभेत मोठी राजकीय समीकरणे बदलण्याची
शक्यता आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा जोरदार प्रचार सुरू असून सुजात आंबेडकर यांची आज तोफ कडाडणार आहे.
आज सायंकाळी ६ वाजता नवी वस्ती बडनेरा येथील आठवडी बाजार परिसरात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत सुजात आंबेडकर मार्गदर्शन करणार असून, महानगरपालिकेतील प्रश्न, विकास आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडणार आहेत.
यानंतर सायंकाळी ७.३० वाजता प्रभाग क्रमांक १०, फ्रेजरपुरा येथे वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून आगामी निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणी आणि प्रचाराला वेग देण्यात येणार आहे.
दौऱ्याच्या शेवटी सायंकाळी ८ वाजता राहुल नगर, बिच्छू टेकडी येथील समाज मंदिराजवळ आणखी एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेलाही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यात युवा नेते सुजात आंबेडकर येणार असल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तसेच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सुजात आंबेडकर यांच्या या दौऱ्यामुळे अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात रंगत आली असून, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.






