नांदेड : नांदेड – वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज एक ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची सभा पार पडली. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पार्टी यांच्यातील नव्या युतीचे मोठे शक्तीप्रदर्शन आज जेतवन मैदान (डॉ. आंबेडकर नगर, फायर स्टेशन) येथे पाहायला मिळाले. या जाहीर सभेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली.

जेतवन मैदानावर उसळला जनसागर
नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या या सभेला दुपारी २ वाजेपासूनच नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

पंतप्रधानांचा आत्मा गुजरातमध्ये अडकलाय!
सभेला संबोधित करताना बाळासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवरून टीकास्त्र केले. ते म्हणाले की, “देशाच्या संपत्तीतून होणारा नफा भारताच्या तिजोरीत जात नसून तो ‘रिलायन्स’कडे जात आहे. प्रधानमंत्री जरी देशाचे असले तरी त्यांचा आत्मा गुजरातमध्ये अडकला आहे. त्यांचे शरीर देशभर फिरते, पण ते केवळ गुजरातला काय नेता येईल यासाठीच फिरतात. म्हणूनच मी त्यांना देशाचा नाही तर ‘गुजरातचा प्रधानमंत्री’ म्हणतो.”

युद्धनीती आणि ‘गाठिया-फाफड्या’वर टीका –
सीमेवरील परिस्थितीवर भाष्य करताना आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. “युद्धाचा निर्णय पंतप्रधान आणि कॅबिनेटचा असतो, पण युद्ध कसे लढायचे हे लष्कराचे काम असते. मात्र, स्वतःला ‘विश्वगुरू’ समजणाऱ्या ‘गाठिया आणि फाफड्या’ला (पंतप्रधानांना उद्देशून) वाटते की, आपण युद्धाचेही गुरू आहोत. त्यांच्या याच वृत्तीमुळे पहिल्या दिवशी युद्धाने जे भारताचे नुकसान झाले, त्याची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच आहे,” अशा शब्दांत त्यांनी मोदींवर प्रहार केला.

‘ही युती सत्ता परिवर्तनासाठी’ –
“नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचितची युती केवळ निवडणुका जिंकण्यासाठी नाही, तर सामान्यांच्या हातात सत्ता देण्यासाठी आहे. जोपर्यंत उपेक्षितांचे प्रतिनिधी महापालिकेत सन्मानाने बसत नाहीत, तोपर्यंत शहराचा खरा विकास होणार नाही,” असे सांगत त्यांनी महिला आणि तरुणांना परिवर्तन घडवण्याचे आवाहन केले.

वंचित बहुजन आघाडी नांदेड शहर जिल्हा यांच्या वतीने या सभेचे चोख नियोजन करण्यात आले होते. सभेला काँग्रेसचे स्थानिक नेते, वंचितचे पदाधिकारी आणि सर्व उमेदवार उपस्थित होते. बाळासाहेब आंबेडकरांच्या या झंझावाती भाषणामुळे नांदेडमधील निवडणुकीचे संपूर्ण चित्र पालटल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.






