PSI वयवाढीच्या मागणीला सुजात आंबेडकरांचा पाठिंबा !
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्व परीक्षा (गट ‘ब’) २०२५ संदर्भात निर्माण झालेल्या वादावर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी भूमिका मांडली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमधून राज्य सरकार आणि MPSC च्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
संयुक्त पूर्व परीक्षा (गट ‘ब’) साठी एकूण ६७४ पदांची जाहिरात जुलै २०२५ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली असून, ही परीक्षा थेट ४ जानेवारी २०२५ रोजी घेतली जात आहे. नेहमीची पद्धत पाहता डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात जाहिरात प्रसिद्ध होऊन मार्चमध्ये परीक्षा घेण्यात येते. मात्र यंदा ही वेळापत्रकातील विसंगती उमेदवारांसाठी अडचणीची ठरली आहे.
या परीक्षेसाठी १ नोव्हेंबर २०२५ ही वयोमर्यादा ग्राह्य धरल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने तयारी करणारे हजारो उमेदवार केवळ वयोमर्यादेमुळे अपात्र ठरत आहेत. याबाबत मागील काही महिन्यांपासून विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा उमेदवार शासनाकडे न्यायाची मागणी करत आहेत. तरीही आतापर्यंत कोणताही दिलासादायक किंवा स्पष्ट निर्णय झालेला नाही.
सुजात आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे की, या उमेदवारांनी आपल्या आयुष्यातील मौल्यवान वर्षे या परीक्षेच्या तयारीसाठी दिली आहेत. केवळ प्रशासकीय किंवा तांत्रिक कारणांमुळे त्यांच्यावर अन्याय होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
राज्य सरकारने या प्रकरणात संवेदनशीलता दाखवत न्याय्य निर्णय घ्यावा आणि सर्व पात्र उमेदवारांना परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या मुद्द्यावर राज्यभरातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे लक्ष केंद्रित झाले असून, शासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






