अकोला : नुकत्याच पार पडलेल्या मूर्तिजापूर नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेले अपक्ष नगरसेवक संदीप सरनाईक आणि शुभांगी संदीप सरनाईक यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
मूर्तिजापूर नगरपरिषद निवडणुकीत जनतेने अपक्ष उमेदवार म्हणून संधी दिलेल्या या दोन्ही नगरसेवकांनी, स्थानिक विकास, सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेसोबत काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
“बहुजन, वंचित, शोषित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी ठाम भूमिका घेणारा पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीचे कार्य प्रेरणादायी आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. या पक्षप्रवेश प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नवप्रवेशित नगरसेवकांचे स्वागत करत, त्यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा पक्षसंघटन व नगरपरिषद कामकाजात निश्चितच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला.
यामुळे मूर्तिजापूर नगरपरिषदेत वंचित बहुजन आघाडीची ताकद वाढली असून, येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्ष अधिक प्रभावी भूमिका बजावेल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.






