तेल्हारा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या शामस्कारांच्या तक्रारीने खळबळ !
अकोला : नुकत्याच पार पडलेल्या तेल्हारा नगर परिषद निवडणूक २०२५ च्या निकाल प्रक्रियेवर संशय व्यक्त करणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
वंचित बहुजन आघाडी, शेतकरी पॅनल आणि तेल्हारा नगर विकास मंचच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या सिद्धार्थ शामस्कार यांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. निकालाच्या दिवशी सकाळीच एका अज्ञात नंबरवरून “तुम्ही निवडणूक हरत आहात” असा व्हॉट्सअॅप मॅसेज आल्याने ईव्हीएम (EVM) मशीनमध्ये फेरफार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
नेमकी घटना काय?
विद्या शामस्कार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २१ डिसेंबर २०२५ रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार होते. मात्र, त्यादिवशी सकाळी १०:२३ वाजता त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात क्रमांकावरून ‘हाय’ असा मॅसेज आला.
त्यानंतर १० वाजून ३६ मिनिटांनी “आप चुनाव हार रहे हो” आणि पुढे १० वाजून ४३ मिनिटांनी “१३६९ वोट से” असे धक्कादायक मॅसेज आले. विशेष म्हणजे, ज्यावेळी हे मॅसेज आले, त्यावेळी अधिकृत निकाल जाहीर व्हायचे होते.
गृहमंत्री कार्यालयाचा फोटो आणि संशयास्पद प्रोफाईल :
संबंधित अज्ञात क्रमांकाच्या व्हॉट्सअॅप प्रोफाईलवर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो असून सोबत कोट-टाय घातलेला एक इसम दिसत आहे. तसेच, त्या बिझनेस अकाऊंटवर “साकेतकुमार पी. एस. टू होम मिनीस्टर” असे नाव दिसत आहे. निकालाच्या गडबडीत असल्याने शामस्कार यांनी २२ डिसेंबर रोजी रात्री हे मॅसेज पाहिले, त्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. असे विद्या शामस्कार यांनी सांगितले.
नगरपरिषद निवडणूक यशानिमित्त जालन्यात वंचित बहुजन आघाडीचा आनंदोत्सव
राजकीय षडयंत्राचा आरोप :
शामस्कार यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, “विशिष्ट राजकीय पक्षाच्या इशाऱ्यावरून ईव्हीएम मशीनमध्ये अनधिकृत हेरफेर करण्यात आली आहे. मॅसेजमध्ये वर्तवलेला पराभवाचा आकडा आणि प्रत्यक्ष निकालातील तफावत पाहता, हे एक सुनियोजित राजकीय षडयंत्र असल्याचे दिसते. निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून माझी आणि जनतेची फसवणूक झाली आहे.”
सखोल चौकशीची मागणी
विद्या शामस्कार यांनी पोलिसांकडे या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधित मोबाईल धारकाचा शोध घेण्याची मागणी केली आहे. त्यांच्या पॅनलचे ५ उमेदवार निवडून आले असून ७ उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करता निवडणुकीत ‘घोळ’ झाल्याचा त्यांचा ठाम आरोप आहे. त्यांनी पुराव्यादाखल संबंधित मॅसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांना सादर केले आहेत.
या प्रकरणामुळे तेल्हारा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस आता या अज्ञात ‘साकेतकुमार’ नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.






