अकोला : नागरिकांनी आता ठरवायचे आहे की त्यांना घाणीत, अविकसित शहरात राहायचे आहे की विकासाच्या दिशेने जाणारे शहर हवे आहे. जर घाणीत राहायचे असेल तर कमळाला मतदान करा, नाहीतर वंचितला साथ देऊ आमच्या हाती सत्ता द्या असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
मंगळवारी सकाळी अकोला येथे यशवंत भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशवंत भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी भाजपवर कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, शहरात महिलांसाठी मूलभूत सुविधा नाहीत, करांचा (टॅक्स) बोजा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. भाजप सत्तेने नागरिकांवर अन्यायकारक कर लादले असून, ही लूट थांबवली पाहिजे. यासंदर्भात दिवंगत नगरसेविका धनश्री देव यांनी याचिका दाखल केली होती असेही त्यांनी सांगितले. महापौर वंचित बहुजन आघाडीचा असताना शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. आज शहराची लोकसंख्या वाढत असताना पाणी आरक्षणाबाबत कोणताही ठोस विचार झालेला नाही. दगडपरवा धरणातील पाणी शहरासाठी आरक्षित करण्याचा निर्णय होणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकशाही की सत्ताधाऱ्यांची मक्तेदारी? पुण्यात आचारसंहितेचा खेळ सुरू
शहरातील डम्पिंगचा प्रश्न गंभीर असून, किमान चार डम्पिंग ग्राउंड उभारले पाहिजेत. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हे एका अर्थाने ‘सोने’ असून, त्यातून रोजगार व उत्पन्ननिर्मिती शक्य आहे; मात्र भाजप सत्तेने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले, असा आरोपही त्यांनी केला.
भाजपच्या काळात करांची लूट आणि असुविधा
शॉप अॅक्टच्या भाडेवाढीबाबत बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित सत्तेत असताना कोणतीही भाडेवाढ करण्यात आली नव्हती. भाजपनेच ही भाडेवाढ करून व्यापारी व नागरिकांवर बोजा टाकला आहे. तसेच रेल्वे उड्डाणपुलाचे काम वर्षानुवर्षे रेंगाळत असून, ते पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात काहीच झालेले नाही.
वाढते तापमान आणि पर्यावरणाचे आव्हान
अकोल्याचे वाढते तापमान चिंतेचा विषय असून, बाळापूर परिसरात तापमान तुलनेने कमी असते. अकोल्याचे तापमान कमी करण्यासाठी मोरणा नदीवर बंधारा उभारण्यासह विविध उपाययोजना राबविण्याचा वंचित बहुजन आघाडीचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. खुले नाट्यगृह नव्याने उभारण्याचाही विचार असल्याचे आंबेडकर यांनी नमूद केले. मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराप्रमाणे पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन अकोल्यातही राबवू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. उबाठा, शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आमची युती बाबत बोलणे झाले आहे. स्थानिक वंचितचे नेते याबाबत अंतिम निर्णय घेतील असेही ते म्हणाले. 29 तारखेला अंतिम निर्णय होईल. असेही आंबेडकर म्हणाले.
यावेळी पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक निलेश देव, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, बालमुकुंद भिरड, सचिव मिलिंद इंगळे, संतोष रहाटे, गजानन गवई, पराग गवई, वंदना वासनिक यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






