नांदेड : आगामी नांदेड महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने (VBA) कंबर कसली असून, आज पार पडलेल्या मुलाखतींच्या प्रक्रियेला उमेदवारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पहिल्याच टप्प्यात तब्बल ७८ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. नांदेडच्या राजकीय वर्तुळात ‘वंचित’च्या वाढत्या ताकदीची चर्चा सुरू झाली आहे.
दिवसभर मुलाखतींचा धडाका
नांदेड महानगरपालिकेवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी पक्षाने आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन केले होते. सकाळी सुरू झालेल्या या प्रक्रियेसाठी इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह मोठी गर्दी केली होती. प्रत्येक प्रभागातून सक्षम आणि जनसंपर्क असलेल्या चेहऱ्यांनी मुलाखती देऊन आपली दावेदारी सादर केली.
७८ उमेदवारांचे अर्ज दाखल
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या प्रक्रियेत आज एकूण ७८ जणांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज सादर केले. यामध्ये तरुणांचा आणि अनुभवी कार्यकर्त्यांचा मोठा समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यात मिळालेल्या यशानंतर नांदेडमध्येही ‘वंचित’ची ताकद वाढल्याचे या गर्दीवरून स्पष्ट होत आहे.
मुलाखती दरम्यान उमेदवारांचा सामाजिक कार्याचा अनुभव, प्रभागातील पकड आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा यावर भर दिला जात आहे. “नांदेडच्या विकासासाठी आणि वंचितांच्या हक्कासाठी सक्षम उमेदवार मैदानात उतरवले जातील,” असा विश्वास पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद, राज्य कार्यकारिणी सदस्य अविनाश भोसीकर, प्रशांत इंगोले, शिवा नरंगले, शाम कांबळे उपस्थित होते.





