– राहुल ससाणे
नगरपंचायत व नगरपरिषद निवडणूक २०२५ चे निकाल आज दिवसभर विविध प्रसारमाध्यमांतून आपण पाहत होतो. या निवडणुकांच्या निकालांचे वृत्तांकन पाहिल्यावर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली आणि ती म्हणजे इथल्या प्रस्थापित मीडियाने वंचित बहुजन आघाडी व इतर आंबेडकरी विचारांच्या पक्ष संघटनांच्या संघर्षाची अजिबातच दखल घेतली नाही. किंवा तशी दखल घ्यायला पाहिजे अशी भावना देखील त्यांच्या मनात निर्माण झाली नाही. खरोखरच याचे आश्चर्य आणि दुःख वाटते. इथल्या प्रस्थापित मीडियाला दलित , बहुजनांच्या स्वतंत्र राजकारणाची कायमस्वरूपी भिती वाटत असलेली आहे. ही भिती त्यांची तर आहेच पण खरी भिती त्यांना चालवणाऱ्या भांडवलदारांना, कारखानदारांना आणि प्रस्थापित नेत्यांना वाटणारी आहे. म्हणून इथला विकला गेलेला मीडिया तेच दाखवतो जे हे भांडवलदारांना दाखवायचे असते. अशा जातीयवादी मानसिकतेच्या मिडियाचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. पण केवळ निषेध करून चालणार नाही. तर याला पर्यायी व्यवस्था देखील आपल्याला निर्माण करावी लागणार आहे. अशी पर्यायी व्यवस्था जी सामाजिक न्यायाचा आग्रह धरणारी असेल.
वंचित बहुजन आघाडीच्या स्वतंत्र राजकारणाची खरोखरच भिती व धसका इथल्या जातीयवादी व मनुवादी विचारांच्या पक्ष संघटनांनी घेतलेला आहे. आपली वर्षानुवर्षाची दुकानदारी बंद होण्याची भिती त्यांना सतत वाटत असते . म्हणून ते नवीन स्वतंत्र पर्यायी राजकारण उभे राहू देत नाहीत. परंतु या सर्व षडयंत्राना मुठमाती देत वंचित बहुजन आघाडी आज एका नवीन रूपात समोर आली आहे. इथला वंचित वर्ग आता खऱ्या अर्थाने जागा झाला आहे. जागा होऊन एकत्रित येऊन इथल्या मनुवदी व जातीयवादी सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचे काम करतो आहे. हे या निकालामधून दिसून आले. प्रमुख पक्ष्यांच्या बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अनेक मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार उभे केले आणि हे उमेदवार निवडून देखील आले. वंचित बहुजन आघाडीची लढाई ही खऱ्या अर्थाने इथल्या तळागाळातील शेवटच्या घटकातील व्यक्तीला न्याय देणारी व त्या व्यक्तीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारी आहे.
दिवसभरातील प्रमुख मिडियाने जरी डावले असले तरी इतर छोट छोट्या साधनांच्या ( youtube ,FB ) माध्यमातून विजयी उमेदवारांच्या मुलाखती आपल्याला पाहायला मिळाल्या. ज्यामध्ये उमेदवार सांगत आहेत की , तो किती गरीब कुटुंबातील आहे. कोणत्या प्रवर्गातील व जातीतील आहे ? त्यांच्या जातीचे एकूण मतदान किती आहे ? गेल्या ५० -६० वर्षांमध्ये आम्हाला पाहिजे तसे प्रतिनिधित्व कधीही मिळाल नव्हते . आणि आज मात्र कुठेतरी ते चित्र बदलले आहे. आणि खरे प्रतिनिधी बाळासाहेबांच्या माध्यमातून आम्हाला मिळाले आहे. कुठे वैदू समाजाचा उमेदवार निवडून आला आहे. तर कुठे कोल्हाट्याचं पोर निवडणूक आले.
तर शेवगाव पाथर्डी सारख्या भागामध्ये जिथे प्रस्थापितांच्या विरोधात घराणेशाहीच्या विरोधात एक पारधी समाजाचा व्यक्ती हिमतीने संघर्ष करतो आहे. अशी असंख्य उदाहरणे आहेत. काही मोजकी दोन-तीन उदाहरणे मी या ठिकाणी यासाठी सांगितले आहेत की यामधून आपल्याला लक्षात येईल की किती सूक्ष्म पातळीवरती उमेदवारीचे वाटप या ठिकाणी केलेले आहे. परंतु या प्रवाहातून बाहेर असलेल्या, गावकुसाबाहेर जीवन जगणाऱ्या माणसांची संघर्ष गाथा सांगायला इथल्या प्रस्थापित मीडियाला लाज वाटते. तेव्हा एक प्रश्न समोर येतो की, लोकशाहीचा हा स्तंभ किती खिळखिळा होत चालला आहे. विकला गेलेला व धनिकांच्या ताटाखालील मांजर झालेला मीडिया आपल्याला कधीच न्याय देऊ शकत नाही. दिवसभर अनेक महत्त्वाच्या इलेक्ट्रॉनिक चॅनेल वरती वेगवेगळ्या पक्षांचे नाव आणि त्यांच्या नावासमोर त्यांच्या विजयी उमेदवारांची किंवा आघाडीवर असलेल्या उमेदवारांची संख्या दाखवली जात होती.
साधा एक नगराध्यक्ष निवडून आलेल्या पक्षाचे देखील नाव त्या ठिकाणी त्या तक्त्यांमधून दिसून येत होते. परंतु पाच नगराध्यक्ष आणि ७० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे नाव त्या चौकटीमध्ये त्या तक्त्यांमध्ये दिवसभर कुठेही दिसले नाही. यावरून एक गोष्ट लक्षात येते मीडियाला फक्त तेच दाखवायचे आहे जे इथल्या प्रस्थापित , श्रीमंत कारखानदारांना दाखवायचे आहे. प्रस्थापित मीडियाचे हे जातीवादी वागणे आज खऱ्या अर्थाने समोर आले आहे. या अगोदरही या गोष्टीचा आपण वेळोवेळी अनुभव घेतला आहेच. तुम्ही आमचा संघर्ष दाखवला नाही म्हणून आमच्या कहाण्या लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत. या गोड गैरसमजामध्ये तुम्ही राहू नका. आमच्या संघर्ष गाथा आम्हीच ओरडून ओरडून सांगू . आणि ती ताकद आमच्या प्रत्येक उमेदवारांमध्ये आणि मतदारांमध्ये आहे. सारांश येवढाच की , या सर्व प्रकरणामधून वंचित बहुजन आघाडीच्या व इतर आंबेडकरी पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकच धडा घेतला पाहिजे. आणि तो म्हणजे आपण स्वतःच आपलेच मार्केटिंग व प्रसिद्धी करण्याची गरज आहे.
फेसबुक , इंस्टाग्राम आणि x सारख्या माध्यमांचा वापर करून आपण आपले विचार आणि भूमिका प्रभावीपणे मांडल्या पाहिजेत. इथल्या प्रस्थापित मीडियाला खऱ्या अर्थाने चपराक द्यायची असेल तर आपल्याकडे उपलब्ध असलेल्या छोट्या – छोट्या साधनांचा जास्तीत- जास्त उपयोग आपल्याला करावा लागणार आहे. येणाऱ्या काळामध्ये या गोष्टीचा गांभीर्यपूर्वक विचार करून आपण कृती कार्यक्रम व धोरणात्मक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.
औरंगाबाद मनपासाठी ‘वंचित’ सज्ज! उद्या क्रांती चौकात रंगणार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा धडाका
औरंगाबाद : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी वंचित बहुजन आघाडीने (VBA) कंबर कसली असून, उमेदवारांच्या निवडीसाठी उद्या (दि. २३ डिसेंबर २०२५) ...
Read moreDetails






