मुंबई : महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी सज्ज झाली आहे. १६ ते २२ डिसेंबर या कालावधीत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, पहिल्याच टप्प्यात दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी प्रचंड गर्दी केली आहे.

मुंबईतील सर्व प्रभागांमध्ये पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आधीच सूक्ष्म नियोजनावर भर दिला आहे. वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी आणि युवा आघाडीच्या प्रभाग समन्वयकांचे विशेष प्रशिक्षण शिबिर पार पडले.निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘बूथ’ स्तरावरही पक्षबांधणी पूर्ण झाली असून बूथ प्रमुखांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

मुंबई प्रदेश कमिटीने यावेळेस मुंबई महानगरपालिकेत निर्णायक बदल घडवण्याचा निर्धार व्यक्त केला “आमची निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून, पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवून मुंबईत सत्ता संपादन करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत,” असा विश्वास मुंबई प्रदेश कमिटीने यावेळी व्यक्त केला.





