नवी दिल्ली : शून्यातून विश्व निर्माण करणारा आणि कलेच्या माध्यमातून भारताची ओळख जगाच्या क्षितिजावर कोरणारा एक महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. जगप्रसिद्ध शिल्पकार आणि ‘महाराष्ट्र भूषण’ राम वनजी सुतार यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
धुळ्याचे सुपुत्र ते जागतिक कीर्तीचे शिल्पकार
१९ फेब्रुवारी १९२५ रोजी धुळे जिल्ह्यातील गोंडूर या छोट्याशा गावात जन्मलेल्या राम सुतार यांचा प्रवास थक्क करणारा आहे. श्रीराम कृष्ण जोशी यांच्याकडे कलेचे प्राथमिक धडे गिरवल्यानंतर त्यांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये आपले कौशल्य पारखले. १९५३ मध्ये त्यांनी मानाचे ‘मेयो गोल्ड मेडल’ पटकावले आणि तिथूनच त्यांच्या झळाळत्या कारकिर्दीला सुरुवात झाली.
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ आणि अजरामर कलाकृती
राम सुतार यांच्या नावावर जगातील सर्वात उंच पुतळा म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांचा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ (१८२ मीटर) कोरला गेला आहे. त्यांच्या कलेची वैशिष्ट्ये म्हणजे शिल्पातील बारकावे आणि जिवंतपणा.
दिल्लीतील संसद भवनाच्या प्रांगणात त्यांनी साकारलेली अनेक शिल्पे आजही लोकशाहीची साक्ष देत उभी आहेत. जगभरात त्यांनी २०० हून अधिक भव्य शिल्पे साकारली आहेत.
१९५४ ते १९५८ दरम्यान त्यांनी अजिंठा-वेरूळ लेणींच्या संवर्धनासाठी केलेल्या कोरीव कामातही मोलाचे योगदान दिले होते. “शिल्पकला ही केवळ दगड-मातीची घडवणूक नसते, तर ती इतिहासाला जिवंत ठेवण्याची कला आहे,” असा वसा त्यांनी आयुष्यभर जपला.
त्यांच्या कार्याची दखल घेत 1999 साली पद्मश्री आणि 2016 साली पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. सुमारे 60 वर्षांच्या कारकिर्दीत राम सुतार यांनी 50 हून अधिक भव्य मूर्ती निर्माण केल्या.






