औरंगाबाद : शहरातील नारेगाव परिसरात मुस्लिम समाजासाठी कब्रिस्तानच्या जागेचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या महत्त्वाच्या आणि संवेदनशील प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने युवा नेते अफसर पठाण यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

कब्रिस्तानसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत वारंवार निवेदने, पाठपुरावा व चर्चा करूनही शासन व महानगरपालिका प्रशासनाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. प्रशासनाच्या उदासीन भूमिकेच्या निषेधार्थ आंदोलन अधिक तीव्र करत महानगरपालिका कार्यालयाचे मुख्य गेट बंद करून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामुळे काही काळ मनपा परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नारेगाव येथील नागरिकांना न्याय देण्याची मागणी केली.

“कब्रिस्तान ही मूलभूत गरज असून ती तत्काळ पूर्ण केली पाहिजे,” अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
या आंदोलनात जावेद कुरेशी, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते तय्यब जफर, युवा शहर अध्यक्ष राहुल मकासरे यांच्यासह वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नारेगाव परिसरातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना नेत्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, जोपर्यंत कब्रिस्तानच्या जागेबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. समाजाच्या धार्मिक भावना आणि मूलभूत हक्कांकडे दुर्लक्ष केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.






