राजेंद्र पातोडे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेडूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना १९४२ साली नागपूर येथे केली होती.डॉ. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली देशभरातील दलित वर्गाचे संघटन या माध्यमातुन घडून आले होते.बाबासाहेबांच्या चळवळीवर निष्ठा असणाऱ्यानी अकोला जिल्ह्यात काही दिवसातच शेडूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना करण्यात आली. बाबासाहेबांचे विचार समर्थपणे मांडण्यासाठी शेडूल्ड कास्ट फेडरेशनच्या शाखा गावस्तरापर्यंत गठीत करण्यात आल्या. जिल्ह्यातील कार्यकत्यांनी आंबेडकरी विचारांच्या प्रचारांची शर्थ केली.आणि सारा समाज एकसंघपणे उभा केला. १९४३ साली म्हैसांग येथे पहिले जिल्हास्तरीय शेडूल्ड कास्ट फेडरेशनचे अधिवेशन पार पडले होते. समाज आणि राजकीय जागृती असे ह्या अधिवेशनाचे उद्दिष्ट होते. या अधिवेशनात संभुजी खंडारे, काकासाहेब झ्याबुजी सिरसाट व संभुजी तायडे या नेत्यांनी जगतेला मार्गदर्शन केले.म्हैसांग, पळसोबढे व बार्शिटाकळी येथेही शेडूल्ड कास्ट फेडरेशनची अधिवेशने झाली. त्यामुळे गावागावातील दलितांनी संघटीत होऊन बाबासाहेबांच्या आदेशाबरहुकूम वागण्याचा संकल्प घेतला. शिक्षणाचा मंत्रच ह्या अधिवेशातून मिळाल्याने मुलांच्या शिक्षणाकडे व कुटुंबाच्या राहणीमाना बाबत सजग झाले.राजकीय जागृती व संघटन शक्ती निर्माण झाल्यामुळे चळवळीला नवीनच धार आली.
अकोला जिल्ह्यातील कार्यकत्यांचा उत्साह पाहून प्रांतिक शेडूल्ड कास्ट फेडरेशनचे अधिवेशन अकोला येथे १० डिसेंबर १९४५ ला घेण्यात आले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या अधिवेशनात हजर राहून मार्गदर्शन केले.त्यानंतर अकोला जिल्ह्यात शेडूल्ड कास्ट फेडरेशनने १९५२ व १९५७ साली निवडणुकीत भाग घेतला. काँग्रेस पक्षाला जबरदस्त टक्कर देवून, पक्ष कमकुवत नाही, हे दाखवून दिले.अनेक जागांवर विजय ही प्राप्त झाला होता.अकोला जिल्हा परिषद व नगरपरिषदेयश मिळाले होते.स्वतंत्रबाणा व स्वाभिमान राखत कुणाशीही युती न करता शेडूल्ड कास्ट फेडरेशनने काही ठिकाणी यश प्राप्त केले.
आपली अभेद्य संघटना सर्व जगाला दाखवून दिली पाहिजे.”आपल्या पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून आणून आपले राजकीय हक्क संपादन केले पाहिजेत.शेळी होऊन आयुष्य ना कंठता अन्यायाचा प्रतिबंधच केल्याशिवाय आपला उद्धार शक्य नाही'” असा महत्वाचा राजकीय संदेश डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी वऱ्हाड प्रांतिक शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या पहिलया परिषद मध्ये अकोला (वऱ्हाड) येथे दिला आहे.बाबासाहेबांचा आदेश अकोला जिल्हयाने शिरोधार्य मानला.आताचे शास्त्री स्टेडियम, टॉवर चौक ते भाटे क्लब ह्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेवर ही परिषद संपन्न झाली होती. या परिषदेला अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला व मध्यप्रांत अशा दूरदूरच्या ठिकाणाहून शेकडो प्रतिनिधी उपस्थित झाले होते परिषदेला पाऊण लाख लोक हजर होते. अकोल्याच्या भूमीवर बाबासाहेबांचे क्रांतिकारी भाषण व वऱ्हाड प्रांतिक शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या परिषद अकोला (वऱ्हाड) चा वृत्तांत व परिषदेचे वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहे.
वऱ्हाड प्रांतिक शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या परिषद अकोला.
अकोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रथमच आगमन असल्यामुळे वऱ्हाड प्रांतातील चारही जिल्ह्यातील हजारो स्त्री-पुरुष बाबासाहेबांच्या दर्शनाकरिता आले होते. काही भागातून दोन दिवसाचा प्रवास करुनही लोक आपल्या आवडत्या पुढाऱ्याच्या दर्शनाकरिता व त्यांचा संदेश ऐकण्याकरिता आले होते. बाबासाहेब अकोल्याला येणार असल्याचे आगाऊ माहित असल्यामुळे खास सिनेमातून “अखिल भारतीय बहिष्कृत वर्गाचे एकमेव पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तारीख १० डिसेंबर १९४५ ला अकोल्याला उपस्थित राहून भाषण करणार आहेत ” अशा त-हेची जाहीरात दहा दिवस अगोदर दाखविली जात होती.
थोडक्यात बाबासाहेबांच्या आगमनाविषयी संबंध अकोल्यातील जनतेला नव्हे तर वऱ्हाड प्रांतातील जनतेला आमचे अनभिषिक्त राजे, आमचे पुढारी आम्हाला केव्हा भेटतील अशी उत्कंठा लागून राहिली होती. अकोल्याला येईपर्यंत ज्या ज्या स्टेशनवर गाडी थांबली त्या त्या ठिकाणी त्यांचे हार्दिक स्वागत झाल्यामुळे त्यांना संबंध रात्रभर त्रास झाला होता. प्रतिनिधींना मुलाखती व मध्यप्रातातील पुढाऱ्यांशी आगामी निवडणुकी संबंधी त्यांनी पाऊण तास चर्चा केल्यावर प्रमुख पुढा-याचा फोटो घेण्यात आला.त्यावेळी अकोला रेल्वेस्थानकावर त्यांचे सोबत काढलेल्या फोटो मध्ये अकोल्यातील शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे रेवाराम कवाडे, सभुजी खडारे,पा.ना.राजभोज, दशरथ पाटील, लाकडुजी मडामे, झांगोजी राहाटे, दगडुजी पळसपगार आदी तत्कालीन पदाधिकाऱ्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतचे हे दुर्मीळ छायाचित्र खाली पोस्ट मध्ये आहे.
अकोला स्टेशनापासून प्रचंड मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीची लांबी तीन चार फर्लांग होती. अकोला स्टेशन ते टिळक मैदानापर्यंतचा रस्ता स्त्री-पुरुषांनी फुलून गेला होता. या मिरवणुकीत अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे उत्साही जनरल सेक्रेटरी श्री. राजमोज भारतीय संस्थानी शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष सुबच्या न्यू कामगार परिषदेचे नियोजित अध्यक्ष श्री. सज्जनसिंग, शांताबाई दाणी, नाशिक वगैरे • प्रामुख्याने दिसत होते. वन्हाड प्रांतातील जिल्ह्यातील समता सैनिक दलाने या मिरवणुकीत उत्साहाने भाग घेऊन उत्तम प्रकारे शिरत सामाळी होती. दुतर्फा सैनिक दल, मधोमध पुढान्यांच्या मोटारी, मागे महिला मंगळव इतर जनसमूह व सर्वांच्या आघाडीला नानाविध वाद्याचे ताफे आणि मर्दानी दांड पट्टयाचा खेळ आणि बैंड अशा उत्साही थाटात व बाबासाहेबांच्या जयघोषात मिरवणूक चालली होती. मिरवणुकीत डॉ. आंबेडकर कौन है। दलितोंका राजा है।” शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचा विजय असो हरिजन नावाचा धिक्कार असो. आंबेडकर झिंदाबाद। थोडे दिनमें भीमराज वगैरे गगनभेदी घोषणानी सर्व वातावरण दुमदुमून गेले होते.
अशा अपूर्व सोहळ्यात मिरवणूक ‘साध्वी रमाबाई आबेडकर नगरात विसर्जन पावल्यावर श्री. सुबय्या यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला. अध्यक्षानी उभारलेल्या शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचा निळा झेंडा उंचावर जाऊन फडकला. समता सैनिक दलाने त्याला खडी सलामी दिली. त्यावेळी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात व फेडरेशनच्या जयघोषात वातावरण दुमदुमून गेले होते.समता सैनिक दलाची परिषद श्री सुब्बय्या यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडल्यावर लगेच महिला परिषद शांताबाई दाणी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सौ. गिताबाई गायकवाड व मिसेस नाईक यांनी महिलांना स्फूर्तिदायक आदेश दिल्यावर परिषदेचे कामकाज संपले.बरोबर साडेपाच वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मंडपात आगमन झाले. त्यावेळी गगनभेदी घोषणांनी व टाळ्यांच्या कडकडाटानी सारे वातावरण हर्षोत्फुल्ल झालेले होते, ध्येयनिष्ठेनी ओथंबलेल्या त्या अस्पृश्य वर्गाचा स्वाभिमान व स्वावलंबन याचे हे दिव्य प्रतीक पाहून स्वधर्मीय व विधर्मीय लोकांच्या तोंडून आपोआपच धन्योदगार बाहेर पडत होते.
परिषदेचे कामकाज
परिषदेची सुरुवात बरोबर साडेसहा वाजता नागपूरचे शेंद्रे वकील यांनी आपल्या सुस्वर गायनानी केली. स्वागताध्यक्ष श्री. डी. झेड. पळसपगार यानी आपल्या भाषणात जमलेल्या मंडळीचे व बाबासाहेबांचे स्वागत केले.नंतर अकोल्याचे अकर्ते वकील (काँग्रेस), अमृतकर वकील (हिंदू महासभा) म्युनिसीपल कमिटीचे अध्यक्ष रावबहादूर आठल्ये मुस्लिम लीगचे सभासद श्री. काझी वकील यांनी बाबासाहेबांची मुक्त कंठाने स्तुती करून बाबासाहेब हे केवळ अस्पृश्यांचेच ठरत नसून अखिल भारताचे ते पुढारी, तपस्वी आहेत. अशा तऱ्हेची घोषणा करून बाबासाहेबांच्या चळवळीविषयी व फेडरेशन पक्षाविषयी आदर व्यक्त केला. नंतर डिप्रेस्ड क्लासेस असोशिएशनचे जनरल सेकेटरी रावसाहेब ठवरे यांनी आपण हा पक्ष सोडून फेडरेशन पक्षामध्ये सामील कसे झालो यासंबंधी उल्लेख करून आपले भाषण संपविले यांनी दाखविले. आली. तदनंतर श्री इंगळे अखिल वऱ्हाड प्रांतातील अस्पृश्य जनतेतर्फेचे मानपत्र वाचून नंतर डॉ. बाबासाहेबाना ११०१ रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. बरोबर साडेसात वाजता डॉ. बाबासाहेब बोलायला उभे राहिले. यावेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होऊन आंबेडकर झिंदाबाद, आबेडकर कौन दलितोंका राजा हैं वगैरे गगनभेदी जयघोष सारखा चालला होता. जनसमुदाय पुन्हा शांत झाल्यावर बाबासाहेबांनी आपले भाषण सुरू केले. ते म्हणाले,
“बंधूंनो आणि भगिनींनो !
आतापर्यंतच्या वक्त्यांनी जी भाषणे केली आहेत त्यावरून माझी भूमिका स्पष्ट झाली आहे. तेव्हा त्याचेसंबंधी मी चर्वीतचर्वण न करता इलेक्शनसंबंधी बोलणार आहे. तुम्हाला माहित आहे की यावेळचे इलेक्शन म्हणजे १९३७ सालचे इलेक्शन नाही. यावेळचे इलेक्शन म्हणजे अस्पृश्यांचा जगण्या-मरण्याचा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवून आपल्या जीविताचे आद्यकर्तव्यकर्म आपण बजाविले पाहिजे आणि आपली अभेद्य संघटना सर्व जगाला दाखवून दिली पाहिजे अर्थातच फेडरेशनच्या सर्व उमेदवारांना निवडून आणून आपले राजकीय हक्क संपादन केले पाहिजेत.
राजकीय सत्ता हाती असली म्हणजे मनुष्य काय करू शकतो याचे मी उदाहरण सांगतो. मी व्हाइसरॉयच्या ज्या कार्यकारी मंडळात प्रवेश केला त्या मंडळाचे १५ सभासद आहेत. मी तेथे एकटाच आहे. या गोष्टीला अडीच वर्षावर कालावधी लोटला आहे. तेवढ्या अवधीत मी तिथे राहून काय केले हे सांगितले म्हणजे उलगडा होईल. मी तेथे जाण्यापूर्वी मध्यवर्ती सरकारने अस्पृश्यांच्या शिक्षणाची कसलीही जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली नव्हती. मात्र मुसलमानांच्या अलिगड विश्वविद्यालयाला २० लाख रुपयांची मदत देऊन व बनारस हिंदू विश्वविद्यालयाला १९ लाख भांडवल पुरवून सहाय्य केले आहे. शिवाय या दोन्हीही संस्थांना सालिना ३ लाखाची मदत चालूच आहे.
मी तेथे गेल्यानंतर सरकारने अस्पृश्यांकरिता ३ लाख रुपयांची मदत चालू केली आहे. शिवाय ३०० कॉलेज-शिष्यवृत्या प्रत्येकी ६० रुपयाच्या मंजूर झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांना जर मदत द्यावयाची तर ती भरपूर द्यावयाची असे धोरण आखले आहे. याचवर्षी ३० विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी विलायतेस जातील. आता अशी व्यवस्था केली आहे की, निदान २ वर्षात १५ विद्यार्थी विलायतेला येथून जातील. याप्रकारची पूर्वी कधीही नसलेली ही व्यवस्था आज झाली आहे. आता नोकरी संबंधी पहा. मुसलमानांना शेकडा २०. खिश्चनाना शेकडा साडेआठ, पण आपल्याला मात्र अशा प्रकारचे प्रमाण पूर्वी अजिबात नव्हते. फक्त यांचेकडे लक्ष पुरवावे’ एवढीच शिफारस होती. पण नुकतीच माझी मागणी सरकारला पटून आमचेही नोकऱ्यात शेकडा आठ पूर्णांक एक तृतीयांश असे प्रमाण ठरविण्यात आले आहे.
मी तेथे गेलो तेव्हा माझ्या खात्यात अस्पृश्यांचे हमालसुद्धा नव्हते. पण आता डेप्यूटी सेक्रेटरीज २. अडर सेक्रेटरी १ व एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स ३ असे अस्पृश्य वर्गाचे लोक भरले आहेत. कोणी म्हणतात की, मी महारांचेच हित करतो. मी महार जातीत जन्मलो याला मी काय करू, पण माझ्याविरूद्ध केली जाणारी ही तक्रार खोटी आहे. माझ्याच खात्यात सिमल्याला २८ क्लार्क पैकी १८ भगी आहेत. विलायतेला जाणाऱ्या लोकात १ मांग, १ भंगी व चांभार पुष्कळच आहेत. मी आणखी एक गोष्ट यातच सांगू इच्छितो. एक मळकट असा भगी अस्पृश्यांचा उमेदवार जेव्हा मुलाखती करता सिमल्याला आला तेव्हा त्याला खात्रीने नकार मिळेल हे जेव्हा मला समजले तेव्हा बोर्डावर मी माझे वजन आणून त्याला निवडून घेतले. आता तो उमेदवार परदेशात आहे. आत्मप्रौढी करतो असे मात्र समजू नका. मी स्वत ची सागण्याचा हेतू हाच की. राजकीय सत्ता हाती असता मनुष्य काय करू शकतो आणि म्हणूनच अस्पृश्य समाजाला इज्जत व माणुसकीसाठी राजकारण काबीज करायला पाहिजे. म्हणजेच फेडरेशनच्या प्रतिनिधींना कायदे मंडळात जाऊन आमच्यावरील जुलूमाविरूद्ध आवाज काढता आला पाहिजे. ही एक आमची मागणी आहे.
१९२० साली गांधींनी हरिजन संघ काढला. शिष्यवृत्या देण्याचा उपक्रम सुरू केला. हेतु इतकाच की, आमच्या स्वाभिमानी या संघातून हरिजन विद्याथ्र्यांना चळवळीपासून त्यांना आपल्या गोटात ओढणे या बाबतीत मी अस्पृश्य (मूळ प्रतीत आकडा दिलेला नाही. परंतु १८ भगी असल्याचा उल्लेख बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे येथील दि. ४ ऑक्टोबर १९४५ च्या भाषणात केला आहे.) जनतेचा पाठिंबा मिळावा म्हणून काँग्रेसच्या पुढान्याचा हा प्रयत्न आहे. ब्रिटिश निघून गेल्यावर आणि स्वराज्य मिळाल्यावर निरनिराळ्या अल्पसंख्याकाचे हक्क मध्यवर्ती सरकारात कसे संरक्षिले जातील याचा विचारविनिमय करण्यासाठी काँग्रेसने एक हिंदी गोलमेज परिषद बोलावून वाटाघाटी करावयास पाहिजे होत्या. हे करण्याच्या ऐवजी काँग्रेसने इतर पक्षाला डावलले आणि आपल्याच हाती सत्ता असावी असा दावा सुरू केला. काँग्रेसचा हा दुराग्रह आम्ही कबूल करणार नाही. काँग्रेसपासून अलिप्त राहाण्यासंबंधीच माझा तुम्हाला सल्ला आहे.
आज सकाळी एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला, आम्हाला सर्वस्वी स्पृश्यांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे आम्ही जर त्याच्याविरुद्ध काही तक्रार केली तर ती तक्रार देखील ऐकून घेण्याला स्पृश्य अधिकारी तयार नसतो तेव्हा या गोष्टीला आम्ही काय करावे तेव्हा मी म्हणतो, हे जरी खरे असले तरी मी तुम्हाला असे विचारतो की, शेळी होऊन अशा प्रकारचे आयुष्य किती दिवस आणखी कठणार ? कधी ना कधी तरी अन्यायाविरुद्ध तोड काढावे लागणार नाही काय ? आपण जर या अन्यायाचा प्रतिबंधच केला नाही तर आपला उद्धार होणे शक्य तरी आहे काय ? मी तुम्हासमोर कोट, बूट, पाटलोण घालून उभा आहे… माझ्या हातात सोन्याचे घड्याळ आहे. मी स्वच्छ आहे. मला महार म्हणण्याची कोणाची ताकद आहे काय ? तरी पण मी महार आहे (हशा) ही स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी मी जर कच खाल्ली असती तर ही स्थिती प्राप्त झाली असती का? माझ्या हातात सोन्याचे घड्याळ दिसते ते दिसले असते काय ? (हशा) तेव्हा सांगण्याचा मतलब हा की, अन्यायाच्या विरुद्ध तुम्ही लोकांनी ‘जशास तसेच’ या न्यायाने प्रतिकार करायला शिकले पाहिजे. कर्तव्याला जागरूक रहा. तेव्हा मला तुम्हाला शेवटी इतकेच सांगावयाचे आहे की, यापुढचा काळ अत्यत आणीबाणीचा आहे.
त्या करता आपण आपली तयारी भक्कम पायावर केली पाहिजे आणि आपल्या फेडरेशनच्या सर्वच उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावयाला पाहिजे. सरकारने प्रांतिक विधीमंडळामध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधीमधून घटना समिती निवडली जाणार असल्याची घोषणा केली आहे. तयार होईल ती घटना बऱ्याच वर्षाकरिता अस्तित्वात राहिल. कदाचित ती या समितीकडून कायमसुद्धा होईल काँग्रेसने आपल्या काही जागा पटकाविल्या तर आपले नुकसान होईल आणि म्हणून आपणाला स्वतंत्र ध्येय गाठता येणार नाही. त्याकरिता अहोरात्र प्रयत्न करून आपल्या सर्व जागा काबीज केल्या पाहिजेत.इतका तुम्हाला आदेश देऊन मी माझे भाषण संपवितो.”





