मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (६ डिसेंबर २०२५) दादर येथील चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने आलेल्या अनुयायांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडीकोज असोसिएशन (DAMA), मुंबई यांच्या वतीने एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे.
५, ६ आणि ७ डिसेंबर २०२५ या तीन दिवसांदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या मोफत वैद्यकीय तपासणी व ओषध वाटप शिबिराला मोठा प्रतिसाद मिळत आहे.वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांनी या आरोग्य स्टॉलला भेट देऊन डॉक्टर्स व स्वयंसेवकांच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांनी या वैद्यकीय सेवेचा आढावा घेतला आणि या स्तुत्य उपक्रमासाठी आयोजकांचे अभिनंदन केले.
DAMA, मुंबई (Dr. Babasaheb Ambedkar Medicos Association) मधील डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी हे लांबचा प्रवास करून आलेल्या वयोवृद्ध, लहान मुले आणि इतर अनुयायांना तातडीची आरोग्य सेवा देत आहेत.
या शिबिरात के.ई.एम. रुग्णालय, नायर रुग्णालय, सायन रुग्णालय, कूपर रुग्णालय, जे.जे. रुग्णालय यांसारख्या मोठ्या वैद्यकीय संस्थांशी संलग्न असलेले DAMA, मुंबई चे डॉक्टर्स निःशुल्क सेवा देत आहेत.





