पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड हे देशातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या महानगरांपैकी एक शहर आहे. औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या आणि वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली असून, वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे.
या पार्श्वभूमीवर, वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आणि नागरिकांना सुलभ, सुरक्षित व पर्यावरणपूरक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शहरात मेट्रोचे जाळे विस्तारणे अत्यावश्यक आहे.
मतमोजणी पुढे ढकलल्याने घटनात्मक पेच? आंबेडकरांचा सवाल | Prakash Aambedkar
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि पिंपरी-चिंचवडच्या मध्य भागाला पुण्याशी जोडण्यासाठी किवळे – रावेत – डांगे चौक – काळेवाडी – जगताप डेअरी ते चतुःश्रृंगी या महत्त्वाकांक्षी नवीन मेट्रो मार्गाची मागणी करण्यात आली आहे. यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.
सध्या पुणे शहरात मेट्रोचे काम वेगाने सुरू असून, काही मार्गांवर मेट्रो धावत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या दापोडी ते पिंपरी या मार्गावर मेट्रो सेवा उपलब्ध आहे.
याशिवाय, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार निगडी ते भक्ती शक्ती चौकापर्यंतच्या मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू झाले आहे. हा विस्तार पिंपरी-चिंचवडसाठी एक मोठे पाऊल असून, यामुळे नागरिकांना निगडीतून थेट पुण्यापर्यंत मेट्रोने प्रवास करणे शक्य होणार आहे.





