वाशिम : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची मालेगाव, वाशिम येथे भव्य जाहीर सभा पार पडली. नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित या सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी गर्दी केली होती.

सुजात आंबेडकर यांनी आपल्या भाषणात वंचित बहुजन आघाडीची मुस्लीम समाजाला प्रतिनिधित्व देण्याची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, प्रस्थापित पक्ष फक्त मुस्लिमांच्या मताचा वापर करतात. याउलट, वंचित बहुजन आघाडी सातत्याने मुस्लिमांना राजकीय प्रतिनिधित्व देत आहे.
यावेळी त्यांनी माहिती दिली की, वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यात चार मुस्लीम उमेदवारांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे.

मालेगावातील नागरिकांना आवाहन करताना सुजात आंबेडकर यांनी नगराध्यक्ष पदाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रेहमान अहमद शाह यांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. सभेला मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.





