सुजात आंबेडकरांच्या जाहीर सभेला तुफान गर्दी
हदगाव : युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत हदगाव येथे वंचित बहुजन आघाडीची भव्य जाहीर सभा नुकतीच पार पडली. नांदेडमधील या सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, यावेळी मोठी जनसमुदाय उपस्थित होता.

ओबीसी आरक्षण आणि मुस्लिम प्रतिनिधित्वावर भर –
या भव्य जाहीर सभेत बोलताना सुजात आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे जो ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आणि मुस्लिम समाजाला सर्वाधिक राजकीय प्रतिनिधित्व देऊन त्यांच्यासाठी ठामपणे उभा राहतो.”

राजकीय परिवर्तन घडवून वंचित समूहांना सत्तेत पोहोचवण्याचे काम बाळासाहेब आंबेडकर करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
“आता आरक्षणवादी, संविधानवादी, वंचित, शोषित घटकांनी विजयाचा निर्धार करावा आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून सत्ता आपल्या हातात घ्यावी.” असे सुजात आंबेडकर यांनी नागरिकांना आवाहन केले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद आणि राज्य सदस्य अविनाश भोसीकर यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी वंचितांच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
सभेला वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष गोविंद दळवी, शिवा नरंगले, प्रशांत इंगोले, श्याम कांबळे, आकाश जोंधळे, राहुल सोनसळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.






