ॲड. प्रकाश आंबेडकर : मोहन भागवत हिटलर – मुसोलोनी तुमचा आदर्श!
मुंबई : मुंबईच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर आयोजित संविधान सन्मान महासभा दि. 25 नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित केली होती. या सभेला लाखोंच्या संख्येने जनसागर उसळला. देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखों संविधानप्रेमींनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे विचार ऐकण्यासाठी हजेरी लावली. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत थेट, स्पष्ट आणि टोकदार भाषेत केंद्र सरकारच्या धोरणांवर, संघ परिवाराच्या भूमिकेवर आणि देशातील वाढत्या धार्मिक ध्रुवीकरणावर तीव्र टीका केली.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, पंतप्रधान मोदी जगभर दौरे करत असले तरी भारतासाठी कोणताही देश पुढे येत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतावरील विश्वास कमी होत चालला आहे, कारण जगाला भारत आज धार्मिक विभाजनाच्या दिशेने जाताना दिसत आहे. लोकशाहीला मागे ढकलून हुकूमशाहीचा मार्ग स्वीकारला, तर जग आपल्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही.

याच संदर्भात त्यांनी आरएसएसच्या आंतरराष्ट्रीय वैचारिक कनेक्शन्सचा उल्लेख करत मोहन भागवतांना थेट प्रश्न विचारला. १९३० च्या दशकात आरएसएसचे कार्यकर्ते हिटलर आणि मुसोलिनी यांच्या भेटीस गेले होते, असे ऐतिहासिक पुरावे सांगतात. मग तुम्ही सांगा, हिटलरला आदर्श मानता का? मुसोलिनीचा मार्ग मान्य करता का? अशा कठोर पण वस्तुनिष्ठ प्रश्न विचारत आंबेडकरांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
प्रकाश आंबेडकर यांनी पाकिस्तानचे उदाहरण देत सांगितले की, धर्माधारित राष्ट्र किती अस्थिर असते. पाकिस्तानला धर्माच्या आधारावर स्वातंत्र्य मिळाले, पण केवळ २४ वर्षांत त्यांची फूट होऊन बांगलादेश निर्माण झाला. कारण धर्म राष्ट्राला एकत्र ठेवू शकत नाही. राष्ट्राला एकत्र ठेवतात ते समता, स्वातंत्र्य आणि बंधुता. ही मूलतत्त्वे हीच भारताची खरी ओळख आहे.

मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणातील चुकांमुळे भारत एकाकी पडत आहे. उद्या युद्ध परिस्थिती आली आणि अमेरिका, रशिया किंवा चीन यांनी शत्रुराष्ट्राला शस्त्रपुरवठा केला तर आपण काय करणार? आपण जगाशी मैत्री तोडून फक्त नुसत्या भाषणांनी युद्ध जिंकणार आहोत का? असा रोखठोक प्रश्न त्यांनी विचारला. सनातनवाद्यांना उद्देशून त्यांनी सांगितले की देशाची सुरक्षा घोषणांनी नाही, तर तर्कशुद्ध आणि सर्वसमावेशक धोरणांनी होते.
राजकीय स्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले की, भाजप आता देशात एकपक्षीय व्यवस्था निर्माण करत आहे. प्रादेशिक पक्ष संपवून लोकशाहीचे वैविध्य नष्ट केले जात आहे. जे संविधानवादी आहेत तेच राष्ट्रवादी. जे मनुवादी आहेत ते देशाचे विघटन करणारे, असे म्हणत त्यांनी धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर जोरदार प्रहार केला.आपण ठरवले पाहिजे की BJP–RSS ला मत देणार नाही. कारण जे तुमचे हक्क हिरावून घेत आहेत त्यांनाच तुम्ही सत्ता देणार का? तुमचे एक मत म्हणजे तुमचे स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्याची ताकद आहे, असे आंबेडकरांनी म्हटले.

संघटनेच्या नोंदणीच्या प्रश्नावर त्यांनी मोहन भागवतांना थेट आव्हान दिले. देशातील प्रत्येक संस्था नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे, मग RSS ची नोंदणी का नाही? औरंगाबाद कोर्टात तुमच्यावर केस आहे. नोंदणी नसलेल्या संघटनेला सरकारी सुरक्षा का दिली जाते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सभा स्थळी उसळलेली जनसमुदायाची उपस्थिती पाहून ते म्हणाले की हीच उपस्थिती मतपेटीत उतरली, तर लोकशाहीची दिशा बदलू शकते. राजा मतपेटीतून ठरतो. त्यामुळे या पुढच्या निवडणुकांमध्ये आपली ताकद दाखवा, असा त्यांनी जनतेला दिलेला संदेश सभेचा मुख्य गाभा ठरला.
या संविधान सन्मान महासभेला विविध क्षेत्रातील मान्यवरांची भव्य उपस्थिती लाभली. बंगलोर येथील जगद्गुरू चन्नबसवानंद महास्वामी, शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री विजयाबाई सूर्यवंशी, बुलढाण्यातील भन्ते राजज्योती, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना डॉ. अब्दुर रशीद मदणी आणि पंढरपूर येथील ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर बंडगर महाराज हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या केंद्रीय कार्यकारिणीतील अशोक सोनोने, दिशा शेख, अरुंधती शिरसाट, ऍड. प्रियदर्शी तेलंग, महेश भारतीय, डॉ. अरुण सावंत आणि प्रा. किसन चव्हाण यांची उपस्थिती होती. राज्य स्तरावर रेखा ठाकूर, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, फारुख अहमद, डॉ. अनिल जाधव, सर्वजित बनसोडे, सिद्धार्थ मोकळे, अमित भुईगल, राजेंद्र पातोडे आणि अविनाश भोसीकर यांनी हजेरी लावली. राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते, तय्यब जफर तसेच मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे, मुंबई महिला आघाडी अध्यक्षा स्नेहल सोहनी आणि मुंबई युवा आघाडी अध्यक्ष सागर गवई यांच्या उपस्थितीने सभा अधिक भव्य आणि प्रभावी झाली.





