मालेगाव : डोंगराळे येथील तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीने तीव्र निषेध करत अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
संबंधित आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मालेगाव तालुक्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याला काळिमा फासणारी ही घटना आहे. सरकारने ताबडतोब फास्ट ट्रक कोर्टात ही केस घेऊन आरोपीला शिक्षा द्यावी. पीडित कुटुंबियांचे पुनर्वसन करावे, वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभी आहे. असे वंचित बहुजन आघाडीने म्हटले आहे.
दरम्यान, या प्रकरणी अटक करण्यात आलेला नराधम शेखर उर्फ विजय संजय खैरनार (वय २९) असे आरोपीचे नाव असून पोलिस याची कसून चौकशी करत आहेत. आरोपीचे घर सील करण्यात आले आहे. नराधमाने पीडित बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिचा गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट होत आहे.
या भयानक कृत्याने संपूर्ण परिसर हादरून गेला या धक्कादायक घटनेनंतर महिलांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विविध पक्ष, संघटना, सामाजिक संस्था, तसेच नागरिकांकडून निषेध करण्यात येत आहेत.
दरम्यान, शहरातील तृतीयपंथीयांनी या घटनेचा तीव्र निषेध करत कॅन्डल मार्च काढला, तसेच कुसुंबा-मालेगाव महामार्ग रोखून धरला. त्यांनी सरकारवरही टीका केली. त्यांच्या आंदोलनात ग्रामस्थांनी देखील सहभाग नोंदविला. सलग दुसऱ्या दिवशी गावातील व्यवहार पूर्णपणे बंद होते.






