अहमदनगर : कोविड काळात मयत बबनराव खोकराळे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आरोपी डॉक्टरांना तात्काळ अटक करण्याची आणि तपासी अधिकारी डि.वाय.एस.पी. दिलीप टिपरसे यांच्यावर विभागीय चौकशी करण्याची मागणी करत वंचित बहुजन आघाडी, अहमदनगर दक्षिणतर्फे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण केले जात आहे.
उपोषणाची सुरुवात जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली झाली. यावेळी जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, जे. डी. शिरसाठ, हनीफ शेख, प्रवीण ओरे, फैरोज पठाण, राजीव भिंगारदिवे, गणेश राऊत, बाबासाहेब आठवले, डॉ. सीताताई भिंगारदिवे, शोभा आल्हाट, देवीदास भालेराव, प्रतीक जाधव, प्रतीक ठोकळ, संकेत शिंदे, रियाज शेख, अजित कुऱ्हाडे, पिनू भोसले, संजय शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीने आरोप केला आहे की, न्युक्लिअस हॉस्पिटलमधील संबंधित डॉक्टरांनी बबनराव खोकराळे यांच्या प्रकरणात खोटा आरटीपीसीआर अहवाल तयार करून त्यांना कोविड पॉझिटिव्ह घोषित केले.
त्यानंतर मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहासंदर्भात संशयास्पद हालचाली करून परस्पर विल्हेवाट लावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डॉक्टरांवर गुन्हा दाखल असूनही अद्याप अटक न झाल्यामुळे तपासी अधिकाऱ्यांकडून मोठी ढिलाई होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
आरोपी डॉक्टर खुलेआम शहरात वावरत असताना पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संताप वाढला आहे. या निष्क्रीयतेविरोधात वंचित बहुजन आघाडीने आजपासून आमरण उपोषण सुरू केले असून, “कारवाईशिवाय उपोषण उठवणार नाही” असा इशाराही देण्यात आला आहे.






