शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य शक्तीप्रदर्शन
कोल्हापूर : गडहिंग्लज नगरपरिषद नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने वंचित बहुजन आघाडीने ताकदीनिशी निवडणुकीत उतरण्याचा निर्णय आधीच जाहीर केला होता. जिल्हा कार्यकारिणीने राज्य उपाध्यक्ष व जिल्हा निरीक्षक सोमनाथ साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.
या निर्णयाची अंमलबजावणी करत वंचित बहुजन आघाडीने मातंग समाजातील निष्ठावंत व संघर्षशील कार्यकर्ते प्रकाश पुंडलिक कांबळे यांना उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शहरात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, निळ्या झेंड्यांच्या लाटेत उमेदवारांचा अर्ज दाखल होताना परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले होते.
कोल्हापूर दक्षिण जिल्हा महासचिव दीपक कांबळे, सम्यक विद्यार्थी आंदोलन माजी जिल्हाध्यक्ष कृष्णा भारतीय, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश थरकार, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन दुंडेकर, गौतम कांबळे, गडहिंग्लज तालुकाध्यक्ष बाळेश गोळ, फुले–आंबेडकर विद्वत सभा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक डॉ. डी. जी. चिघळीकर, युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष शिवराज कांबळे, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष ए. के. कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले.
अनुसूचित जातींमधील सर्व उपजाती वंचित बहुजन आघाडीच्या पाठिशी उभ्या राहत असल्याने गडहिंग्लज नगराध्यक्ष पदाच्या लढतीत प्रकाश कांबळे यांची उमेदवारी अधिक बळकट होताना दिसत आहे. या शक्तीप्रदर्शनातून वंचित बहुजन आघाडीने गडहिंग्लजमध्ये आपली निवडणूक लढण्याची तयारी आणि जनसमर्थन याचे भक्कम प्रदर्शन केले असून आगामी निवडणुकीत या लढतीला अधिकच रंग चढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.





