वंचित बहुजन आघाडीचा अनोखा पॅटर्न! ‘ईश्वर चिठ्ठी’तून तेल्हारा नगरपरिषद निवडणुकीचा उमेदवार निवडला
अकोला : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू असून, राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. याच दरम्यान, अकोला जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीने (VBA) उमेदवार निवडीसाठी एक अत्यंत अनोखी आणि पारदर्शक पद्धत वापरली आहे, ज्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा होत आहे. इच्छुकांमधून उमेदवार निवडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने थेट ‘ईश्वर चिठ्ठी’ (लॉटरी) पद्धतीचा अवलंब केला आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून अकोला जिल्ह्यातील तेल्हारा नगरपरिषद मध्ये नगरसेवक पदासाठी अक्षरशः ईश्वर चिठ्ठीमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. पक्षाच्या या अनोख्या पद्धतीमुळे निवड प्रक्रियेत पूर्णपणे पारदर्शकता राखण्यात आली.
उमेदवारीसाठी उत्सुक असलेल्या अनेक नावांमध्ये काढलेल्या चिठ्ठीत कल्पना हिवराळे यांच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यानुसार, त्यांना नगरसेवक पदासाठीची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या ऐन तयारीच्या काळात उमेदवारी निश्चित करण्याची ही पद्धत संपूर्ण अकोला जिल्ह्यात आणि राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. या लक्षवेधी उमेदवारी निवड प्रक्रियेवेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे आणि तालुका अध्यक्ष अशोक दारोकार हे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.






