अकोला : अकोला येथील सर्किट हाऊस येथे युवा समिती धनगर समाजाच्या वतीने गाव प्रमुखांची महत्वपूर्ण एल्गार बैठक पार पडली. समाजातील युवा शक्ती एकत्र आणून वंचित बहुजन आघाडीच्या मागे भक्कम पाठिंबा उभारण्याचा निर्धार या बैठकीत सामूहिकरीत्या व्यक्त करण्यात आला.
बैठकीत युवा धनगर समितीचे अध्यक्ष सुमित नवलकर यांनी विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. विशेषतः ओबीसी आरक्षणातील सकारात्मक घडामोडी, युवकांचे राजकीय सक्षमीकरण, शिक्षणातील सुधारणा, आणि कृषी क्षेत्रातील अत्याधुनिकतेची गरज या विषयांवर त्यांनी प्रभावी भाषण करत उपस्थित युवकांना प्रेरित केले. उपस्थित सर्व युवकांनी या मुद्द्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांचा ठाम पाठींबा जाहीर केला.
युवा समितीकडून ओबीसी घोंगडी बैठक दौऱ्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी गाव प्रमुख आणि युवकांनी लोकवर्गणी जमा करून ५००० रुपये समाज मदत म्हणून सुमित नवलकर यांना सुपूर्द केले. सशक्त युवा समितीतील विविध गावांचे प्रमुख तसेच युवा पदाधिकाऱ्यांनी आंबेडकरी चळवळीची आणि वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेची निष्ठा पुन्हा अधोरेखित केली. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, गावोगावी वंचित बहुजन आघाडीचे विचार पोहोचवण्यासाठी आणि मतपरिवर्तन घडवण्यासाठी एकजुटीने आणि कटिबद्धतेने काम करण्याचा संकल्प युवकांनी व्यक्त केला.
या बैठकीमुळे धनगर समाजातील युवकांमध्ये नवीन उर्जा आणि दिशा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आगामी निवडणुकांमध्ये युवकशक्ती निर्णायक ठरणार असल्याचा आत्मविश्वास सर्वांच्या वक्तव्यांतून दिसून आला.





