नाशिक : नाशिक शहरातील सातपूर विभागातील संत कबीर नगर व कामकर नगर परिसरात आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास बिबट्याने उधळलेले थैमान पाहून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले.
स्थानिक नागरिकांवर अचानक केलेल्या या प्राणघातक हल्ल्यात 7 पुरुष आणि 1 महिलेसह एकूण 9 ते 10 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
या दुर्घटनेची बातमी मिळताच वंचित बहुजन आघाडीचे युवा महानगर प्रमुख दिपक पगारे, महासचिव युवराज मनेरे, युवा उपाध्यक्ष कैलास मधुकर बेंडकुळे, तसेच युवा संघटक असलम सय्यद यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
जखमी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी त्यांनी तत्परता दाखवत जखमींना सिव्हिल हॉस्पिटल तसेच श्री गुरुजी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
सद्यस्थितीत जखमींवर उपचार सुरू असून स्थानिक प्रशासन, वनविभागाचे पथक आणि पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली आहे.
या घटनेनंतर सातपूर परिसरात भीतीचे वातावरण असून नागरिकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. बिबट्याला वनविभागाने ताब्यात घेतले असून शेलटर मध्ये रवानगी करण्यात आली आहे.






