नांदेड : नांदेड जिल्ह्यातील 11 नोव्हेंबर 2025 १३ नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात ऐतिहासिक आघाडीची घोषणा करण्यात आली. ही घोषणा खासदार रविंद्र चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली या वेळी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या आघाडीचा पाया 50-50 या तत्त्वावर आधारित असून, दोन्ही पक्षांनी स्थानिक स्तरावर जनहित, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
आघाडी संदर्भातील जागावाटप व रणनीतीसंबंधी चर्चा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार वंचितच्या राज्य समितीमार्फत जिल्हा स्तरावरील टीमच्या माध्यमातून पार पडली. चर्चेनंतर ठरविण्यात आले की तुर्तास १३ नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी संयुक्तपणे लढणार असून, पुढील निवडणुकांसाठीही परस्पर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
पत्रकार परिषदेत ओबीसी आरक्षणाच्या मुद्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. वंचित आघाडीने ठाम भूमिका मांडली की २ सप्टेंबर २०२५ च्या शासन निर्णयावर न्यायालयीन निर्णय येईपर्यंत, ओबीसींच्या राखीव जागा फक्त जुण्या ओबीसींनाच दिल्या जाव्यात. ही मागणी शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेने अधिक बळकट झाली असून, दोन्ही पक्षांनी सामाजिक समतेच्या भूमिकेला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रमुख मुद्दे:
१) कॉंग्रेस–वंचित बहुजन आघाडीची “50-50”च्या तत्वावर आघाडी
२) १३ नगरपालिका व नगरपरिषदेतील निवडणुकांमध्ये संयुक्त लढाई
३) बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेनुसार व राज्य समीतीच्या मार्गदर्शनात जिल्हा स्तरावर वाटाघाटी करण्यात आल्या.
४) ओबीसींच्या हक्कासाठी वंचित आघाडीची ठाम भूमिका – शरद पवारांचा दुजोरा






