ICC Women’s World Cup 2025 : भारताच्या जेमिमा रॉड्रिग्ज हिच्या शानदार शतकी खेळीमुळे भारतीय महिला क्रिकेट संघाने गुरुवारी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव करत आयसीसी महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम फेरीमध्ये दिमाखदार प्रवेश केला.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ४९.५ षटकांत ३३८ धावा करत भारतासमोर विश्वचषक बाद फेरीतील आतापर्यंतचे सर्वाधिक ३३९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाकडून फोबी लिचफिल्डने जबरदस्त शतक झळकावले, तर एलिस पेरी आणि ऍश गार्डनर यांनी अर्धशतके केली.
या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. जेमिमा रॉड्रिग्जने १३४ चेंडूत नाबाद १२७ धावांची उत्कृष्ट खेळी साकारली. तिला कर्णधार हरमनप्रीत कौरने (८८ चेंडूत ८९ धावा) मोलाची साथ दिली. दीप्ती शर्मा (२४) आणि रिचा घोष (२६) यांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे भारताने नऊ चेंडू शिल्लक असतानाच लक्ष्य गाठले आणि महिला एकदिवसीय सामन्यातील सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम केला.
या उपांत्य फेरीच्या विजयामुळे भारताने रविवारी होणाऱ्या आयसीसी महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले आहे. अंतिम सामन्यात भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
संघ :
भारतीय खेळाडू : शफाली वर्मा, स्मृती मानधना, अमनजोत कौर, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), राधा यादव, क्रांती गौड, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर.
ऑस्ट्रेलिया खेळाडू : फोबी लिचफिल्ड, एलिसा हीली (विकेटकीपर), एलिस पेरी, बेथ मूनी, अॅनाबेल सदरलँड, अॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, अलाना किंग, किम गार्थ, मेगन शट.
 
			

 
							




