बीड : कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक मोठी घटना समोर आली आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास पाली गावातील कॅनरा बँकेत अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकून तब्भव 18.5 लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
संपूर्ण गाव झोपेत असताना, चोरट्यांनी अत्यंत व्यावसायिक पद्धतीने आणि सुनियोजित मार्गाने हा गुन्हा केला. प्राप्त माहितीनुसार, चोरट्यांनी बँकेच्या मागील बाजूच्या भिंतीचे कडी-कोयंडे तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी थेट बँकेचा लॉकर गाठला आणि गॅस कटरचा वापर करून तो फोडला. लॉकरमधील अंदाजे 18.5 लाख रुपये रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत तिथून पळ काढला.
दरोड्याची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण बँक परिसर आणि आजूबाजूच्या भागाची कसून तपासणी केली आहे. घटनास्थळावरून चोरट्यांनी वापरलेली साधने, भिंतीवरील खुणा आणि काही महत्त्वाचे पायाचे ठसे जप्त करण्यात आले आहेत.
अतिवृष्टीग्रस्तांना अद्याप अनुदान न मिळाल्याने वंचित बहुजन युवा आघाडीचा तहसील कार्यालयावर घेराव
या चोरीत सहभागी असलेल्या संशयितांची ओळख पटविण्यासाठी आणि या टोळीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात, चोरीची पद्धत पाहता, हा दरोडा एका सुनियोजित आणि प्रशिक्षित टोळीने टाकल्याचा पोलिसांना संशय आहे.
जिल्ह्यात अलर्ट जारी; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, जिल्ह्यातील सर्व प्रमुख चौक्यांवर हाय अलर्ट जारी केला आहे. या मोठ्या बँक दरोड्यामुळे पालीसह संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.
अलिकडच्या काळात बीड जिल्ह्यात झालेला हा सर्वात मोठा बँक दरोडा मानला जात आहे.






