औरंगाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विरोधात वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य समितीने आज औरंगाबाद शहरात ‘जन आक्रोश मोर्चा’चे आयोजन केले आहे. आरएसएसच्या माध्यमातून पोलिसांनी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते राहुल मकासरे आणि आंबेडकरवादी तरुणांवर दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
मोर्चाला सुरुवात, मोठा पोलिस बंदोबस्त
सकाळी ११ वाजता क्रांती चौक येथून या ‘जन आक्रोश मोर्चा’ला सुरुवात झाली आहे. मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत आहे. मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे राज्य समितीचे सर्व पदाधिकारी यात सहभागी झाले आहेत.
यावेळी जमलेल्या क्रांती चौकातून निघालेला हा मोर्चा आरएसएसच्या कार्यालयाजवळ (बाबा पेट्रोल पंप जवळ, औरंगाबाद) समाप्त होणार आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.






