सोलापूर : तिवसा तालुक्यातील सालोरा येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त आठवले कुटुंबियांची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम आणि युवा आघाडी जिल्हा महासचिव सागर भवते यांनी या कुटुंबाला धीर दिला.
सालोरा बु. येथील युवा अल्पभूधारक शेतकरी प्रवीण विश्वासराव आठवले यांनी दि. १७ ऑक्टोबर रोजी सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगरामुळे निराश होऊन आपले जीवन संपवले होते. या पार्श्वभूमीवर, वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने आठवले कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभाग नोंदवला.
यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम यांनी तिवसा तहसीलदार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करून आठवले कुटुंबियांना प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या. आठवले कुटुंब अल्पभूधारक असून, नापिकीमुळे हातचे पीक वाया गेल्याने प्रवीण आठवले यांनी हे दुःखद पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. वंचित बहुजन आघाडीने या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.
या सांत्वन भेटीवेळी जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम, युवा आघाडी जिल्हा महासचिव सागर भवते यांच्यासह माथाडी कामगार आघाडीचे विनय बांबोळे, अनिल सोनोने, नितीन थोरात, सतीश गणेश, किशोर तायडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.