इस्लामाबाद : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तालिबान यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा उफाळला आहे. दोन्ही देशांनी ४८ तासांची शस्त्रसंधी वाढवून दोहा येथे चर्चा करण्याचे ठरवले असतानाच, शुक्रवारी रात्री उशिरा पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत हवाई हल्ला केला. पाक्तिका प्रांताच्या जनका जिल्ह्यात झालेल्या या हल्ल्यात रहिवाशांच्या घरांना लक्ष्य करण्यात आले.
या भ्याड हल्ल्यात महिला आणि मुलांसह ४० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या मृतांमध्ये अफगाणिस्तानच्या क्लब स्तरावरील (क्लब लेव्हल) आठ क्रिकेटपटूंचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे खेळाडू सामना संपवून घरी परतत असताना हल्ल्यात बळी पडले, तर चौघे जखमी झाले आहेत.
शस्त्रसंधी वाढवूनही हल्ला:
बुधवारी दोन्ही देशांमध्ये ४८ तासांच्या शस्त्रसंधीवर सहमती झाली होती आणि नंतर दोहा येथे होणाऱ्या बैठकीपर्यंत ती वाढवण्यात आली होती. शुक्रवारी चर्चा सुरू होणार असताना आणि तालिबानचे शिष्टमंडळ शनिवारी पोहोचणार असताना, पाकिस्तानच्या मुनीर आर्मीने धोका देत रात्री उशिरा हवाई हल्ला केल्याचा आरोप अफगाणिस्तानकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे सीमेवर पुन्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.