कुर्ला : जागृती नगर, कुर्ला (पूर्व) येथील ऐतिहासिक आम्रपाली बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभेची नवीन शाखा स्थापन करण्यात आली आहे.
सुमारे ६० ते ७० वर्षांपूर्वी सूर्यपुत्र यशवंत (भैय्यासाहेब) आंबेडकर यांच्या हस्ते या बुद्ध विहाराची स्थापना झाली होती. स्थापनेपासूनच येथे विविध सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम सातत्याने राबवले जात आहेत. कुर्ला परिसरातील सर्वात मोठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक हेदेखील या परिसरातूनच निघते, हे या विहाराचे विशेष वैशिष्ट्य आहे.
या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेची शाखा स्थापन झाल्यामुळे परिसरात धार्मिक व सामाजिक जागृतीचे नवे वातावरण निर्माण झाले आहे. विहारात नियमित धम्मकार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून समाजातील तरुणांना समता सैनिक दलात सहभागी होण्यासाठी प्रेरित केले जाईल. त्यामुळे या परिसरात एक नवी धम्म क्रांती घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या शाखेचे अध्यक्ष म्हणून सागर संजय बुद्धवंत यांची नियुक्ती करण्यात आली असून तब्बल ४० सदस्यांची जंबो कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे.
या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे झोन अध्यक्ष अनंत जाधव गुरुजी, वंचित बहुजन आघाडीचे स्वप्नील जवळगेकर, रतन तायडे गुरुजी, राजेंद्र वाडते गुरुजी तसेच अनेक धम्मबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदनेने करण्यात आली. मार्गदर्शनपर भाषण, प्रेरणादायी विचार आणि उत्साही वातावरणात हा ऐतिहासिक कार्यक्रम संपन्न झाला.