ओस्लो : व्हेनेझुएलातील लोकशाहीसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या मारिया कोरिना माचाडो यांना नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला. मात्र, शांततेचे नोबेल मिळावे यासाठी युक्रेन, रशिया, भारत पाकिस्तान युद्ध थांबवण्याच्या गप्पा मारणाऱ्या मोदींचे फ्रेंड डोलांड ट्रम्प यांची मात्र घोर निराशा झाली आहे.
माचाडो यांनी व्हेनेझुएलामध्ये वाढत असलेल्या हुकूमशाहीच्या विरोधात लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी अदम्य धैर्य आणि दृढ संकल्प दाखवला आहे. त्यांच्या या संघर्षाची दखल घेत नोबेल समितीने या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे.
या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. युक्रेन युद्ध आणि इतर आंतरराष्ट्रीय संघर्षांमध्ये मध्यस्थी केल्याबद्दल त्यांना नामांकन मिळेल, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही नावाची चर्चा गोदी मीडियाने सुरू केली होती. मात्र, नोबेल ज्युरीने शांतता आणि मानवाधिकारांसाठी लढणाऱ्या माचाडो यांच्या कार्याला अधिक महत्त्व दिले आणि त्यांना हा सन्मान देण्याचा निर्णय घेतला.
माचाडो यांचे कार्य
- अभियांत्रिकी आणि व्यवसायाची पार्श्वभूमी असलेल्या मारिया कोरिना माचाडो यांनी आपले जीवन देश आणि समाजाच्या सेवेसाठी समर्पित केले आहे.
- १९९२ मध्ये ‘अटेनिया फाउंडेशन’ या संस्थेद्वारे त्यांनी काराकासच्या रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांचे जीवनमान सुधारण्याचे काम केले.
- ‘Súmate’ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले आणि लोकांना निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले.
- २०१० मध्ये राष्ट्रीय विधानसभेवर (National Assembly) त्यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला, परंतु २०१४ मध्ये सत्ताधाऱ्यांनी त्यांना पदावरून हटवले.
- ‘व्हेन्टे व्हेनेझुएला’ (Vente Venezuela) पक्षाचे नेतृत्व: पदावरून हटवल्यानंतरही त्या थांबल्या नाहीत आणि विरोधी पक्षाचे नेतृत्व करत राहिल्या.
- २०१७ मध्ये ‘सोय व्हेनेझुएला’ आघाडीच्या स्थापनेत सहभाग: राजकीय मतभेद बाजूला ठेवून लोकशाही समर्थक शक्तींना एकत्र आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
नोबेल शांतता पुरस्कार दरवर्षी अशा व्यक्तींना किंवा संस्थांना दिला जातो, ज्यांनी जागतिक शांतता, मानवाधिकार आणि संघर्ष निराकरणात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.